Monday, January 30, 2023

अर्णब गोस्वामींना तातडीने अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार; कोठडीतील मुक्काम वाढणार?

- Advertisement -

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तातडीने अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टाने गुरुवारी नकार दिला. मूळ तक्रारदार आणि पोलिसांचं म्हणणं ऐकल्याशिवाय अंतरिम दिलासा देण्याचा निर्णय दिला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटलं. अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांना प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत. (mumbai hight court reject bail arnab goswami)

न्यायालयाचा शुक्रवारी कामकाजाचा शेवटचा दिवस असून त्यानंतर दिवाळीची सुटी सुरू होईल. त्यातच अलिबाग न्यायालयाने जामिनावरील सुनावणी कधी घेणार हे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे अर्णब यांना तातडीने अंतरिम जामीन मंजूर करावा अशी विनंती त्यांचे वकील अबाद पोंडा यांनी केली होती. शुक्रवारी सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकल्यावरच निर्णय दिला जाईल असं न्यायालयाने म्हटलंय.

- Advertisement -

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी नाईक कुटुंबांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी नाईक कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी बंद करून तसं न्यायालयाला कळवलं आहे. त्यामुळे हे प्रकरण बंद करावं आणि अर्णब गोस्वामी यांना मुक्त करावं या करता अर्णब यांचे कुटुंबीयही उच्च न्यायालयात गेले आहेत.

काय आहे प्रकरण?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.

अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले असावे असा अंदाज आहे. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in