मुंबईने दिल्लीला लोळवले ; दिल्लीचा 57 धावांनी पराभव करत मारली अंतिम फेरीत धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गटविजेत्या मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स ला धूळ चारत आयपीएल 2020 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)ना 57 रनने धूळ चारली आहे. मुंबईने ठेवलेल्या 201 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातीपासूनच दाणदाण उडाली. दिल्लीचे पहिले तीन बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले, यानंतर मात्र त्यांना सावरता आलं नाही. ट्रेन्ट बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन आणि बुमराहने दुसऱ्या ओव्हरमध्ये एक विकेट घेऊन दिल्लीच्या बॅटिंगला मोठं खिंडार पाडलं. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस आणि अक्सर पटेल यांनी दिल्लीला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईच 200 धावांचे बलाढ्य आव्हान त्यांना पेललं नाही.

मार्कस स्टॉयनिसने 46 बॉलमध्ये 65 रन, अक्सर पटेलने 33 बॉलमध्ये 42 रन केले. तर जसप्रीत बुमराहने 4 विकेट, बोल्टने 2 आणि कृणाल पांड्या, कायरन पोलार्डला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

तत्पुर्वी, मुंबईच्या बॅट्समननी धडाकेबाज फटकेबाजी करत दिल्लीला 201 रनचं मोठं आव्हान दिलं. या मॅचमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच बॉलला आऊट झाला. पण क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादवने आक्रमक बॅटिंग सुरूच ठेवली. तर कृणाल पांड्या आणि कायरन पोलार्ड स्वस्तात बाद झाल्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये अक्षरशः गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत आक्रमक फलंदाजी करत मुंबईला 200 रनपर्यंत पोहोचवलं. इशान किशनने 30 बॉलमध्ये नाबाद 55 रन तर हार्दिक पांड्याने 14 बॉलमध्ये नाबाद 37 रन केले. सूर्यकुमार यादवने 38 बॉलमध्ये 51 आणि क्विंटन डिकॉकने 25 बॉलमध्ये 40 रन केले. दिल्लीकडून अश्विनला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर एनरिक नॉर्किया आणि मार्कस स्टॉयनिस यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

या आयपीएलमधला दिल्लीचा मुंबईविरुद्धचा हा तिसरा पराभव आहे. याआधी ग्रुप स्टेजमधल्या दोन्ही मॅचमध्ये मुंबईने दिल्लीला पराभवाची धूळ चारली होती. आता दिल्ली ला फायनल ला जायचं असेल तर त्यांना बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यातील एका संघाला हरवावं लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment