मुंबई महानगर क्षेत्र विस्तारणार वसई, अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर पर्यंत, मुख्यमंत्री बैठकीत निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

• तीन नव्या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी
• गायमुख ते शिवाजी चौक, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व कल्याण ते तळोजा मार्गाचा समावेश
• मेट्रोच्या संचालनासाठी ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळा’च्या स्थापनेस मंजुरी
• मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वॉर रुम, नव्या बोध चिन्हाचे अनावरण

मुंबई । सतिश शिंदे

बृहन्मुंबई व परिसराची झपाट्याने होणारी वाढ नियोजित पद्धतीने व्हावी, यासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर मेट्रो मार्ग १० – गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड), मेट्रो मार्ग ११ वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्ग १२ च्या प्रकल्प अहवालास यावेळी मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे निर्माण झाले होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १४६ वी बैठक आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बांद्रा कुर्ला संकुलातील कार्यालयात झाली. यावेळी हे निर्णय घेण्यात आले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, प्राधिकरणाचे सहआयुक्त प्रवीण दराडे आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबई व परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. या विकसनशील क्षेत्राचा सुयोग्य व नियोजित विकास होण्यासाठी एमएमआरडीएने हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत ठेवला होता. यामध्ये संपूर्ण पालघर तालुका, वसई तालुक्यातील ऊर्वरित भाग, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल व खालापूर तालुक्याचा ऊर्वरित भागाचा समावेश आहे.यामुळे पूर्वी असलेल्या ४२५४ किमी. क्षेत्र वाढून आता एमएमआरडीएचे क्षेत्र हे ६२७२ कि.मी. इतके होणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, प्राधिकरणामध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्या या भागातील सर्व क्षेत्राची विकासाची क्षमता प्रचंड असून आता त्याचा सुनियोजित आणि दीर्घकालीन स्वरूपाचा विकास होण्यास मदत होईल. या क्षेत्रातील विकास केंद्रांवर आमचा भर राहणार असून तेच या क्षेत्राच्या विकासाचे गमक ठरणार आहे.

मुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या स्थापनेस मंजुरी
मुंबई व परिसरात मेट्रोचे जाळे पसरत आहे. मेट्रोचे अनेक मार्गाच्या कामांना गती मिळाली आहे. त्यापार्श्वभूमीवर मेट्रोच्या संचालनासाठी मुंबई मेट्रो संचालन महामंडळ स्थापण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षी अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्गिका – ७ आणि दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो मार्गिका २-अ सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळा’ची स्थापना हे आणखी एक पुढचे पाऊल ठरले आहे. हे महामंडळ स्वायत्त स्वरूपाचे असून मेट्रो सोबतच मोनोरेलचेही संचालन आणि व्यवस्थापन याबाबतचे काम ते पाहणार आहे. या महामंडळाच्या अनुषंगाने सुमारे १००० पदे निर्माण करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्गिका-१० (४,४७६ कोटी रू., ११.४ किमी), वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मेट्रो मार्गिका-११ (८,७३९ कोटी, १४ किमी) आणि कल्याण – तळोजा मेट्रो मार्गिका १२ (४,१३२ कोटी रू., २५ किमी) या तीन मार्गिकांचे सविस्तर प्रकल्प अहवालही या बैठकीत मंजूर करण्यात आले. हे अहवाल लवकरच पुढील कार्यवाहीसाठी शासनास सादर करण्यात येतील.

‘जागतिक व्यापार सेवा केंद्र’ (आय.एफ.एस.सी) आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग वांद्रे-कुर्ला स्थानकाशी जोडण्याचा निर्णयही प्राधिकरणाने घेतला आहे. या कामासाठी ‘हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन’ ला अनुक्रमे ४.५ हेक्टर आणि ०.९ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. हे दोन्ही प्रकल्प एकत्र आल्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल गतिमान संपर्कक्षेत्रात येणार असून त्यामुळे रोजगार तर निर्माण होणार आहेच पण प्राधिकरणाला ४ इतका चटई क्षेत्र निर्देशांकही वापरता येणार आहे. या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या अत्यल्प प्रकल्पग्रस्तांचे विद्यमान निकषांनुसार पुनर्वसन केले जाणार आहे.

विरार ते अलिबाग बहुद्देशीय मार्गावरील (मल्टिमॉडेल कॉरिडॉर) नवघर ते बालावली या टप्प्यातील कामाचे स्वरूप लक्षात घेता ‘प्रकल्प अंमलबजावणी घटक’ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि पुनर्वसाहत, कंत्राटदारांची नियुक्ती, संबंधित कायदेशीर बाबींची हाताळणी, विविध परवानग्यांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांशी समन्वयन, सुरक्षा व्यवस्था इ. च्या पार्श्वभूमीवर ते कार्यरत राहणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ‘कलिना कॅम्पस’ भागाशी निगडित असणाऱ्या दोन रस्त्यांच्या पार्श्वभूमीवर ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणूनही प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. बी.के.सी. आणि हंस भुर्गा मार्ग जोडणारा २ कि.मी. लांबीचा उन्नत मार्ग आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील आगमन-प्रयाण सुलभ व्हावे म्हणून बांधला जाणारा ६९० मीटर लांबीचा रस्ता यासाठी विद्यापीठाची काही जागा प्राधिकरणास प्राप्त होणे आवश्यक आहे.

वॉर रुम अँड इनोव्हेशन सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन मंत्रालायात उभारलेल्या ‘वॉर रूम’ च्या धर्तीवर प्राधिकरणानेही ‘वॉर रूम अँड इनोव्हेशन सेंटर’ची स्थापना केली आहे. त्याचे उद्घाटनही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्राधिकरणाने हाती घेतलेल्या भव्य स्वरूपाच्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या ‘वॉर रूम’ची प्राधिकरणात आवश्यकता होती. विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या प्रसंगी त्वरित निर्णय घेऊन ते मार्गी लावण्याबरोबरच अत्यावश्यक आणि मुलभूत स्वरूपाचे संशोधन कार्य हाती घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई महानगर क्षेत्र सर्वंकष विकासाच्या दृष्टींने प्रगतीपथावर नेण्यासाठी या ‘वॉर रूम’ची उपयुक्तता सिध्द होणार आहे.

एमएमआरडीच्या बोधचिन्हाचे तसेच हरित धोरणाचे अनावरण
यावेळी एमएमआरडीएच्या नव्या बोध चिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. प्राधिकरणाचे नवे बोधचिन्ह हे प्राधिकरणाने हाती घेतलेल्या तसेच संकल्पित प्रकल्पांचे बोलके प्रतीक ठरले आहे. “प्राधिकरणाने हाती घेतलेले विविध उपक्रम आणि त्याची भविष्यातील कामकाजाची नियोजित दिशा याचे यथार्थ दर्शन या बोधचिन्हांमुळे होते,” असे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मेट्रो मार्गांच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या ‘हरित धोरणा’चा शुभारंभ तसेच तीन मेट्रो स्थानकांना हरित स्थानक प्रमाणपत्रही या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हरित धोरणामुळे नियोजनाच्या पहिल्या टप्यापासूनच ऊर्जेच्या सुयोग्य वापराचे मार्गदर्शन संबंधितांना प्राप्त होणार आहे. तसेच प्राधिकरणने या दिशेने उचललेली पाऊले लक्षात घेऊन ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौंसिल’ आणि सी.आय.आय. यांनी संयुक्तपणे मेट्रो मार्गिका २अ,२ब आणि ७ वरील ५२ उन्नत स्थानकांना ‘हरित स्थानक प्रमाणपत्र’ दिले आहे.

वारसा प्राप्त मालमत्तांच्या नकाशा प्रकाशित
मुंबई महानगर क्षेत्रातील नैसर्गिक आणि उभारणी केलेल्या वारसाप्राप्त मालमत्तांच्या नकाशांची मालिकाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी प्रकाशित करण्यात आले. हा उपक्रम मुंबई महानगर क्षेत्राच्या ‘हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटीने’ हाती घेतला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक स्वरूपाच्या वारसाहक्क मालमत्ता आणि नैसर्गिक स्थळांचे दस्तावेजीकरण करून ते लोकांना संदर्भासाठी उपलब्ध करून देण्याचा हा अशा तऱ्हेचा पहिलाच उपक्रम आहे. यातील फोर्ट, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे असे बृहन्मुंबईशी संबंधित चार आणि ठाणे,कल्याण, वसई-विरार, माथेरान आणि पेण-अलिबाग असे पाच नकाशे उर्वरित मुंबई महानगर क्षेत्राशी संबंधित आहेत.
प्राधिकरणाच्या बैठकीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, मीरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

1 thought on “मुंबई महानगर क्षेत्र विस्तारणार वसई, अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर पर्यंत, मुख्यमंत्री बैठकीत निर्णय”

Leave a Comment