हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशाची आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत वाहतुकीचा प्रश्न अजूनही कायम आहे. ट्रॅफिक जॅमसारखी समस्या वारंवार या धावत्या शहराला रोखण्याचा प्रयत्न करते . पण कधी कधी धीम्या गतीने का होईना मुंबई शहर आपला वेग गाठण्याचा प्रयत्न करत असतो. मुंबईत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता सरकारने द्रुतगती मार्गावर पूल उभारून मुंबईचा वेग कायम राखण्यात मदत केली. सरकारने काही वर्षांपूर्वी मुबंईत सर्वप्रथम वांद्रे – वरळी सी लिंक पूल बांधला अन वाहतुकीला होणारा वेळेचा अन ट्रॅफिकचा अडसर दूर केला. सरकार आता मुबंईत अजून एक सागरी पूल बांधणार असून त्यायोगे मुंबईची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार आहे.
भारतातील सर्वात लांब सागरी पूल-
मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक (MTHL) चे काम 25 ते 26 मे पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पुलाची लांबी 16.5 किमी असेल. ओपन रोड टोलिंग (ओआरटी) असणारा हा भारतातील पहिला पूल असेल. पुलाच्या माध्यमातून मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हा प्रवास 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. MTHL ची लांबी 22 किमी असेल, त्यापैकी 16.5 किलोमीटर लांबीचा रस्ता समुद्रावर असेल. पूल बांधण्यासाठी सुमारे 18 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पुलाच्या उद्घाटनानंतर मुंबईकरांना वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
या पुलाची काही ठराविक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत ती जाणून घेऊयात.
1. सागरी सेतूच्या बांधकामामुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
2. या पुलावर 6 लेनचा रस्ता आणि 2 आपत्कालीन मार्ग आहे.
3. या पुलावर सीसीटीव्हीची सुविधा पाहायला मिळते.
4. याशिवाय टोलच्या पायाभूत सुविधाही उभारल्या जातील.
5. पुलावर लॅम्पपोस्टही लावण्यात येणार आहेत.
6. ट्रान्स-हार्बर लिंकवर ओपन टोलिंग सिस्टम असल्यामुळे वाहनांना पुलावर सतत टोल भरण्यासाठी थांबावं लागणार नाही.