Tuesday, February 7, 2023

धक्कादायक ! अभ्यासाच्या तणावातून डाॅक्टर तरुणीची आत्महत्या

- Advertisement -

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील वरळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एमबीबीएस झालेल्या डॉ. निताशा बंगाली हिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली आहे. ती २९ वर्षांची होती. आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होणार की नाही, या तणावात तिने टाेकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

वरळीतील समुद्र दर्शन इमारतीत निताशा हि आई-वडील व भावासोबत राहत होती. निताशाचे आई, भाऊ, मावशी डॉक्टर आहेत तर वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. निताशा केईएममध्ये पदव्युत्तरच्या तृतीय वर्षाला होती. निताशाने गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता घरी परतल्यावर भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेतला. यानंतर संध्याकाळी निताशाची आई घरी आली तेव्हा निताशा बेशुद्धावस्थेत हाेती. यानंतर निताशाला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

- Advertisement -

मागच्या काही महिन्यांपासून निताशा तृतीय वर्षात उत्तीर्ण हाेणार की नाही? नापास झाले तर मित्र-मैत्रिणींना, कुटुंबाला कसे तोंड देणार, अशा अनेक विचारांमुळे ती मानसिक तणावाखाली होती. या तणावामुळे सतत मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे तिने आपल्या आईला सांगितले होते. त्यावेळी आईने तिची समजूत काढली होती. या आत्महत्येप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांच्याकडून देण्यात आली आहे.