Sunday, May 28, 2023

विश्वास नांगरे पाटील यांच्या सासऱ्यांच्या विरोधात ईडीची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ईडीच्यावतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलेला आहे. दरम्यान ईडीच्यावतीने आज ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान औरंगाबाद येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे पद्माकर मुळे हे सासरे आहेत.

ईडीच्यावतीने आज ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्यामध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबादसह सात ठिकाणी ईडीने या धाडी टाकल्या आहेत. त्यापैकी औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिक असलेले पद्माकर मुळे यांच्यावरही ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यावसायिक हे विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आहेत. ईडीच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत मुळे यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे.

वक्फ बोर्ड हा विभाग सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतो. वक्फ बोर्डाच्या जमिनी भाडेतत्त्वावर देता येतात मात्र त्याची विक्री करता येत नाही. मात्र औरंगाबादमधील काही उद्योगपतींनी त्या इमारती भाडेतत्त्वार घेऊन त्यावर मोठमोठ्या इमारतीही बांधल्या आहेत. त्या इमारतीतील गाळे थेट रजिस्ट्री, खरेदीखत करून त्याची विक्री करण्यात आली. यामध्ये शेकडो कोटींचा गैर व्यवहार झाला होता. यासंदर्भातील तक्रारी ईडीकडे दाखल झाल्या होत्या. याविरोधात ईडीने तपास सत्र सुरु होते. त्यानुसार औरंगाबाद मध्येही आज ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे.