औरंगाबाद – जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक दोन व वार्ड क्रमांक आठसाठी मंगळवारी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज सकाळी तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. दुसरीकडे सिल्लोड नगरपरिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे.
फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विजयी –
वार्ड क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा ढोके यांना 279 मते घेऊन विजयी, तर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या विमल ढोके यांना 277 मते मिळाली. केवळ दोन मताने राष्ट्रवादीच्या पूजा ढोके या विजयी झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या संगीता पाबळे यांना 9 मते, तर नोटासाठी 5 मतदान झाले. वार्ड क्रमांक आठमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अर्चना दुतोंडे यांनी 434 मते घेऊन विजयी, भाजपच्या रुपाली बनसोडे यांना केवळ 290, तर वंचित बहुजन आघाडीच्या पुष्पा मोरे यांना सात मते मिळाली. नोटाला या वार्डात सहा मते मिळाली. यापूर्वीही या ठिकाणी भाजपचा उमेदवाराचा होता. मात्र झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा भाजपच्या हातातून गेल्या असून महाविकास आघाडीला या निवडणुकीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार व नेते कार्यकर्ते यांनी तहसील आवारातच फटाके फोडून विजयाचा उत्सव साजरा केला. त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांवरून फेरी काढून आनंदोत्सव साजरा केला आहे.
सिल्लोड पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी –
सिल्लोड नगरपरिषदेच्या एका जागेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत अपेक्षेनुसार शिवसेनेने बाजी मारली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नगरपरिषदेवर एकहाती वर्चस्व असून, मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर, आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात झालेली मतमोजणीत सुरुवातीपासून शिवसेनेच्या उमेदवार पठाण फातमाबी जब्बार खान आघाडीवर होत्या. त्यांनी एकहाती विजय मिळवित प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली. शहरातील प्रभाग क्रमांक 12 च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, वंचित आघाडी, राष्ट्रवादीसह दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेच्या पठाण फातमाबी जब्बार खान यांना 2019, बहुजन वंचित आघाडीच्या पठाण कैसरबी बनेखा यांना ३८९, भाजपच्या छाया मिसाळ यांना 210, काँग्रेसच्या शेख जकीयाबी अकबर यांना 53, राष्ट्रवादीच्या शेख फरीदा बेगम रऊफ यांना 26, अपक्ष शेख आस्मा मुक्तार यांना 79, तर पठाण रईसाबी चांदखा यांना 9 मते मिळाली. मतमोजणीसाठी उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्वाचन अधिकारी संदीप पाटील, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विक्रम राजपूत यांनी काम पाहिले.