व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून बढती; प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून बढती देण्यात आली आहे. मोहोळ यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र जाहीर केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये संघटनात्मक बदल पाहायला मिळाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप सरचिटणीस पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानुसार भाजपा प्रदेश श्रीमती माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, संदीप केणेकर, रणधीर सावरकर यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, या नियुक्ती नंतर मोहोळ यांनी पक्षाचे आभार मानले आहेत. माझ्यासारख्या वॉर्ड अध्यक्ष पदापासून काम केलेल्या कार्यकर्त्याला आज महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी दिली, हे फक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकते. संघटनात्मक पातळीवर ही मोठी संधी दिल्याबद्दल माझे नेते, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक धन्यवाद !आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेने काम करुन सार्थ करुन दाखवेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

2024 लोकसभा पुण्यातून लढणार??

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना पुण्याचे उमेदवार म्हणून पाहिले जाते. मोहोळ यांची जमेची बाजू म्हणजे भाजपसह इतर पक्षातील अनेक नेत्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतही त्यांचे चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतले म्हणूनही ते ओळखले जातात. त्यामुळे लोकसभा 2024 निवडणुकीत त्यांना भाजपकडून पुणे मतदारसंघाची उमेदवारी मिळते का ते पाहावं लागेल.