मुरबाड : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पार्किंगवरुन झालेल्या वादानंतर एका डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या आरोपीने डॉक्टरवर चक्का कोयत्याने हल्ला केला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात हा भयंकर प्रकार घडला आहे. मुरबाडमधील यांनी आपल्या क्लिनिकबाहेर आपली बाईक पार्क केली होती. या ठिकाणी बाईक पार्क केल्याच्या वादातून डॉ. धीरज श्रीवास्तव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ज्यावेळी डॉक्टर आपली दुचाकी घेऊन निघत होते त्यावेळी आरोपीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) February 15, 2022
डॉक्टरांच्या हात-डोक्याला दुखापत
हा वाद पुढे वाढत गेला यानंतर आरोपीने डॉक्टर धीरज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने सुरुवातीला डॉक्टर धीरज यांना काठीने मारहाण केली. या आरोपीला एवढा राग आला होता कि त्याने जवळच असलेला कोयता घेऊन डॉक्टर धीरज यांच्यावर हल्ला चढवला. डॉक्टर धीरज यांनी आरोपीचा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला मात्र या हल्ल्यात डॉक्टर धीरज यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.
घटना सीसीटीव्हीत कैद
मुरबाड तालुक्यातील अंजली गॅस एजन्सीच्या परिसरात हि घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करून आरोपी भाऊ मुरबाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरदिवसा करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.