व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुलीच्या प्रेमविवाहास मदत केली म्हणून बापाने केले कत्तीने वार; महिला जागीच ठार

किनवट : तालुक्यातील बुरकूलवाडी येथे मुलीच्या प्रेमविवाहासाठी मदत केल्याचा राग मनात धरून सेवानिवृत्त सीआरपीएफ जवानाने एका विवाहतेच्या गळ्यावर कत्तीने वार करून तिचा खून केला. ही घटना सोमवारी सकाळी 9:45 च्या सुमारास घडली. दरम्यान, आरोपी स्वतःहून इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. बेबीताई भीमराव चव्हाण (वय 40) असे मृत महिलेचा नाव आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, बुरकूलवाडी येथील सुरेश धनसिंग राठोड हे सेवानिवृत्त सीआरपीएफचे जवान आहेत. सध्या ते शेती करतात. दरम्यानच्या काळात सुरेश यांच्या मुलीचा गावातील एका मुलासोबत प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाहास गावातील बेबीताई कारणीभूत असून त्यांच्यावर राठोड यांचा दाट संशय होता.याच कारणावरून या दोघांमध्ये अनेक वेळा वादही झाला होता. मी तुला सोडणार नाही, तुला कधी ना कधी बघून घेतो, असे म्हणून राठोड यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत दिली होती.

अखेर सुरेशने सोमवारी बेबीताईवर कत्तीने वार केले. या वेळी बेबीताई रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाल्या. खून करून राठोड स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला व गुन्ह्याची कबुली दिली. मृत महिलेचा मुलगा मनोज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, सहाय्यक पोलीस निरीक्षक किंगने यांनी सांगितले. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली.