साताऱ्यात चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा गळा दाबून खून : पतीसह चाैघांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पत्नी माहेरी जात असल्याच्या कारणावरून चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची फिर्याद सातारा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. फिर्यादीवरून पतीसह सासू, सासरा व दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. शीला दादासो फाळके (वय- 30, रा. कूपर काॅलनी, सदर बझार सातारा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दि. 17 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीला हिचा दादासो फाळके याच्यासोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते. शुक्रवारी रात्री नऊ वाजता शीला फाळके ही घरातील बेडरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर तिला घरातल्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर नातेवाइकांनी शीलाचा खून झाला असून, संबंधितावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. जिल्हा शासकीय रुग्णालयात शीलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्यामुळे शवविच्छेदन अहवाल पोलिसांना समजू शकला नाही.

परंतु शीला माहेरी जाते या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. तर पती दादासो फाळके याने चारित्र्याच्या संशयावरून शीलाचा गळा दाबून खून केला. अशी तक्रार मोनिका जर्नादन साठे (रा. सदर बझार, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पती दादासो फाळके याला ताब्यात घेतले आहे. तर सासू अरुणा गणपत फाळके, सासरे गणपत मारुती फाळके, दीर सागर गणपत फाळके (सर्व रा. कूपर काॅलनी, सदर बझार, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Leave a Comment