Wednesday, June 7, 2023

राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा? नवाब मलिकांनी दिले ‘हे’ संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलंय. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कडून देखील स्वबळाचा नारा दिला जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.

नवाब मलिक म्हणाले, तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होतील अशी परिस्थिती नाही. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्वच नाही. अशा ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात लढत होईल. ज्या ठिकाणी दोन पक्षांची, तीन पक्षांची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल, ती परिस्थिती बघून निर्णय होणार आहे असे त्यांनी सांगितले.

दानवेंना लगावला टोला-

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत, हे देशातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला माहीत आहे. ज्या मंत्र्यांना अधिकार नाहीत, ते फक्त बोलण्यासाठी मंत्री झालेत. त्यांच्या बोलण्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.