एन. चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास प्रकरणात जामीन मंजूर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास प्रकरणात सोमवारी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. ते तेलगू देसम पक्षाचे प्रमुख असून 28 नोव्हेंबरपर्यंत त्यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली होती.
31 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना वैद्यकीय कारणास्तव चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. एन. चंद्राबाबू नायडू हे 29 नोव्हेंबरपासून पक्षाच्या सभा, रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतील, असे आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोट्यवधी रुपयांच्या कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केल्यानंतर आणि एसीबी प्रकरणांसाठी विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याच्या एका दिवसानंतर 10 सप्टेंबरपासून एन. चंद्राबाबू नायडू राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात होते.
या वर्षी मार्चमध्ये, सीआयडी ने मागील तेलगु देसम पक्षाच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास विकास महामंडळ (APSSDC) मध्ये ₹3,300 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. 2014 मध्ये बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी या महामंडळाची स्थापना तत्कालीन राज्य सरकारने केली होती. एन. चंद्राबाबू यांच्यावर 371 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आंध्र प्रदेश सीआयडीने केला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना 28 नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता जामीन मिळाला होता.
नायडू सरकारने ₹3,300 कोटींच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या सामंजस्य करारामध्ये सायमन इंडस्ट्री सोफ्टवेअर इंडिया लि. Siemens Industry Software India Ltd आणि डिझाईन टेक सिस्टीम्स प्रा. लि. Design Tech Systems Pvt Ltd सह एक संस्था सामील होती, ज्यांना कौशल्य विकासासाठी उत्कृष्टतेची सहा केंद्रे स्थापन करण्यास सांगितले होते. आंध्र सरकारने एकूण प्रकल्प खर्चाच्या सुमारे 10 टक्के योगदान देणे अपेक्षित होते, तर सीमेन्स आणि डिझाईन टेक उर्वरित निधी अनुदान-सहाय्य म्हणून प्रदान करतील, असे ठरले होते. सीआयडीच्या तपासानुसार हा प्रकल्प प्रमाणित निविदा प्रक्रियेचे पालन न करता सुरू करण्यात आला होता. कॅबिनेटने या प्रकल्पाला मंजुरी दिली नाही, असा आरोप सीआयडीने केला आहे.