नागपूर पदवीधर मतदारसंघ: भाजपच्या बालेकिल्ल्याचा ढासळतोय बुरुज; दुसऱ्या फेरीतही पिछाडीवर

नागपूर । राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. पदवीधर, शिक्षक आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर (Graduate And Teacher Constituency Elections) निवडल्या जाणाऱ्या सदस्याची निवड होणार आहे. या सर्व मतदारसंघांसाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. दरम्यान, धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी बाजी मारत भाजपाला आनंदवार्ता दिली आहे. मात्र, दुसरीकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचा बुरुज कोसळत असल्याचं चित्र दिसत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 19 उमेदवार रिंगणात होते.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी चुरशीची लढत सुरु असून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत पिछाडीवर राहिलेल्या भाजपच्या हाती दुसऱ्या फेरीतही निराशा हाती लागली आहे. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत भाजप पिछाडीवर आहे. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी 7262 मतांनी आघाडी घेतली आहे.

अभिजित वंजारी यांना दुसऱ्या फेरीत 11497 मतं मिळली आहेत. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 9085 मतं मिळाली आहेत. पहिल्या मतमोजणीत अभिजित वंजारी यांना 12617 मतं मिळली आहेत. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 7767 मतं मिळाली. सध्याच्या आकडेवारीवरुन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर राहतील असा कल मतमोजणीवरून दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like