रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाची डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही दिवसांत डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात येत आहे तसेच रुग्णालयाची तोडफोडदेखील करण्यात येत आहे. नागपूरमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. यामध्ये नागपूर येथील मानकापूर परिसरात असलेल्या कृणाल रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णाच्या मृत्यू नंतर संतप्त झालेल्या जमावाने डॉक्टरांवर हल्ला करत रुग्णालयाची तोडफोड केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कृणाल रुग्णालयात एका तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला करून रुग्णालयाची तोडफोड केली.

हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यावेळी हा जमाव रुग्णालयात तोडफोड करत होता त्यावेळी त्या ठिकाणीच रुग्णावर उपचार सुद्धा सुरू असल्याचे दिसत आहे. या रुग्णालयातील एका बेडवर वयोवृद्ध रुग्णावर उपचार सुरू होते आणि त्याच्याच शेजारी हा जमाव तोडफोड करत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.