हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेटपटू नमन ओझाचे वडील विनय ओझा यांना मुलताई पोलिसांनी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत 2013 मध्ये विनय ओझा यांनी सव्वा करोड रुपयांचा घोटाळा केला होता. याप्रकरणी विनय ओझा हे फरार होते. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ओझा याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत बँक व्यवस्थापक अभिषेक रत्नम यांनी गंडा घालण्याचा कट रचला होता. रत्नमची बदली झाल्यानंतर त्याच वर्षी विनय ओझा यांनी आणखी ३४ बनावट खाती उघडली. त्यानंतर त्यांच्यावर KCC कर्ज हस्तांतरित केले आणि सुमारे 1.25 कोटी रुपये घेतले. यावेळी विनय ओझा हे बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून रुजू झाले होते. विनय ओझा, माजी व्यवस्थापक अभिषेक रत्नम, विनोद पवार, लेखापाल नीलेश चलोत्रे आणि दीनानाथ राठोड यांनी ही रक्कम आपापसात वाटून घेतली.
सुमारे वर्षभरानंतर बँकेचे नवीन शाखा व्यवस्थापक रितेश चतुर्वेदी यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी पोलिस ठाण्यात घोटाळ्याची तक्रार केली. फिर्यादीनुसार, बनावट नाव आणि फोटोच्या आधारे किसान क्रेडिट कार्ड बनवून बँकेतून रक्कम काढण्यात आली. आरोपींनी मृताच्या नावाने खाते उघडून रक्कम काढली. यासोबतच इतर शेतकऱ्यांच्या नावे केसीसी करून पैसे काढण्यात आले.
तपासाअंती पोलिसांनी तत्कालीन व्यवस्थापक अभिषेक रत्नम, नीलेश चलोत्रे आणि इतरांविरुद्ध गंडा घालणे, फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून विनय ओझा फरार होते . अखेर त्यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने विनय ओझाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.