Wednesday, February 8, 2023

राज्‍य सरकार आणि पोलिसांकडून अर्णव गोस्वामीचा शारीरिक छळ ; नारायण राणेंचा आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी याना अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर भाजपा नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असं म्हटलं आहे.

“अर्णब गोस्वामी यांचं प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल,” असं म्हणत नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.

- Advertisement -

दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधी पक्ष भाजप याप्रकरणी ठाकरे सरकारवर टीका करत आहेत. ठाकरे सरकार हे सगळं सूडबुद्धीने करत आहे असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’