राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत.

लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले होते. 2014 ला नरेंद्र मोदींना समर्थन देणारे राज ठाकरे मोदींचे कट्टर विरोधक झालेले आपल्याला पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी व्हिडीओ दाखवून मोदी सरकारच्या धोरणांची पोलखोल केली होती. मात्र वाडा तालुक्यातील हे बॅनर वेगळेच चित्र अधोरेखित करत आहे.

वाडा पंचायत समितीसाठी भाजप आणि मनसे यांची युती असल्याने मोदी आणि राज ठाकरे यांचे एकाच बॅनरवर फोटो लागले आहेत. तर ही युती नसून गाव पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समजुतीने झालेला तोडगा आहे, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. 7 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

You might also like