डॉ सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात आणखी एक खुलासा, ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या हत्येप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. यानंतर आता या हत्येप्रकरणी बाळासाहेब म्हस्के याला अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब म्हस्के हा आरोपी संदीप वाजे याचा मावस भाऊ आहे. बाळासाहेब म्हस्के याने पोलिसांसमोर आपला गुन्हा मान्य केला आहे.

मृतदेह जाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर
डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह आणि गाडी सॅनिटायझरने पेटवून देण्यात आली. आरोपी बाळासाहेब म्हस्के यानेच संदीप वाजे याला ही आयडिया दिली होती.आगीत मृतदेह संपूर्ण जळावा यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्यात आला होता. यासाठी आरोपींनी डॉ सुवर्णा वाजे यांच्याच क्लिनिकमधील सॅनिटायझरचा वापर केला होता.

मोबाइल लोकेशनमुळे अडकला जाळ्यात
डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा पती संदीप वाजे याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आरोपी संदीप वाजे पोलिसांना या तपासात सहकार्य करत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता संदीप वाजे आणि त्याचा मावस भाऊ बाळासाहेब म्हस्के या दोघांचे लोकेशन एकच आढळून आले. तसेच दोघांमध्ये वारंवार फोनवरुन संभाषण होत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी बाळासाहेब म्हस्के याला अटक केली.

बाळासाहेब म्हस्के याच्यावरही पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
बाळासाहेब म्हस्के हा आरोपी संदीप वाजे याचा मावस भाऊ आहे. बाळासाहेब म्हस्के याच्यावरही डॉ. सुवर्णा वाजे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याता आरोप आहे.या प्रकरणात बाळासाहेब म्हस्के याला अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तो जामीनावर बाहेर आला होता.

काय आहे नेमके प्रकरण ?
डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या सिडको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. घटनेच्या दिवशी रायगड नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. डॉ. सुवर्णा वाजे या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनासुद्धा दिली होती. पोलीस तपासात जळालेल्या गाडीचा चेसी नंबर आणि गाडी नंबर यावरुन ही गाडी डॉ. सुवर्णा वाजे यांची असल्याचं स्पष्ट झालं होते. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली असता डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप यानेच आपल्या पत्नीचा थंड डोक्याने काटा काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. कौटुंबीक कलह आणि त्यातून उडणारे वारंवार खटके यातूनच संदीप वाजे याने आपल्या मित्रांच्या मदतीने आपल्या पत्नीची हत्या केली होती.