Saturday, June 3, 2023

नॅशनल बेसबाॅल स्पर्धा : सातारा ब्लू जायस संघास सुवर्णपदक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा ब्लू जायस संघ एम. एल. बी. कपचा विजेता ठरला आहे. भारतात प्रथमच झालेल्या बेसबाॅल स्पर्धेत सातारच्या ब्लू जायस संघाने पुण्याच्या एंजल्स संघावर 14-4 असा फरकाने व 10 गुणांनी विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. संघातील पार्थराज जाधव या खेळाडूस स्पर्धेतील उत्कृष्ट हिटर तर पार्थ भोसले हा होम रन डर्बीचा उपविजेता खेळाडू ठरला.

भारतात प्रथमच झालेल्या मेजर लिग बेसबॉल आयोजित पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. या एम. एल. बी. कप स्पर्धेत सातारा ब्लू जायस संघ विजेता ठरला आहे. अंतिम सामन्यात सातारा ब्लू जायसने पुणे एंजल्स संघावर 14- 4 असा 10 गुणांनी विजय मिळवून सुवर्णपदक मिळवले आहे. विजयी संघाच्या खेळाडूंची दहिवडी शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर क्रिडा प्रबोधिनीतील महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज दहिवडीचा 11 वर्षाखालील मुलांचा हा संघ आहे. एम.एल.बी स्पर्धेसाठी एकूण 87 संघांनी नोंदणी केली होती. त्यातून 30 संघांची सरावासाठी निवड केली होती. अंतिम स्पर्धेसाठी देशातून 12 संघांची निवड करण्यात आली होती. 10 ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत गुरगाव (दिल्ली) येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.

या स्पर्धेत सातारा ब्लू जायस संघाने पहिल्या फेरीत पुणे एंजल्स संघावर 22 – 12 असा विजय मिळवला. दुसर्‍या फेरीत मल्लपुरम व्हाईट साॅक्स संघाला 21 – 00 असे पराभूत केले. तिसर्‍या फेरीत पाँडेचरी मेट्स या संघावर 19 – 04 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात कोल्हापूर ब्रेव्हज संघावर 14 – 03 अशी मात केली. तर अंतिम सामन्यात पुणे एंजल्स संघाला 14 – 04 असे पराभूत करुन विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास चषक, पदक तसेच स्लगर बक्षिस मिळाले.