काश्मीरमध्ये आजपासून ‘पोस्टपेड मोबाइल’ सेवा पूर्ववत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । काश्मीर खोऱ्यात गेले ६९ दिवस संचारमाध्यमांवर असलेले निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, या ठिकाणचे सुमारे ४० लाख पोस्टपेड मोबाइल दूरध्वनी सोमवार दुपारपासून कार्यरत होतील, असे जाहीर केले आहे. देशभर दूरदर्शनवरून प्रक्षेपित करण्यात आलेल्या श्रीनगरमधील पत्रकार परिषदेत जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव व प्रवक्ते रोहित कन्सल यांनी ही घोषणा केली. तथापि, २० लाखांहून अधिक प्रीपेड मोबाइल दूरध्वनी, तसेच मोबाइल व इतर इंटरनेट सेवा सध्या बंदच राहणार आहेत.

केंद्र सरकारने गेल्या ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून, राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, राज्याच्या सर्व उर्वरित भागांमधील मोबाइल सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेमकेपणाने सांगायचे, तर सर्वच कंपन्यांचे सर्व पोस्टपेड मोबाइल फोन १४ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजेपासून पूर्ववत सुरू होतील, असे निवेदन कन्सल यांनी वाचून दाखवले. हा निर्णय काश्मीर प्रांताच्या सर्व १० जिल्ह्य़ांना लागू असेल असे ते म्हणाले.

दरम्यान मोबाइल फोन कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे ही सेवा पूर्ववत सुरू होण्याची घोषणा ही संचारविषयक नाकेबंदी संपवण्यातील सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे पर्यटकांना मोबाइलअभावी पांगळे व्हावे लागणार नाही, विद्यार्थी त्यांच्या पालकांशी, व्यापारी ग्राहकांशी संपर्क साधू शकतील, असे कन्सल म्हणाले.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment