Wednesday, October 5, 2022

Buy now

राष्ट्रीय लोक अदालत : एकाच दिवसात सातारा जिल्ह्यातील 13 हजार 177 प्रकरणे निकाली

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील पक्षकारांची वाद व वादपूर्व प्रकरणे ही सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने आयोजित लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये एकूण 13 हजार 177 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यात 10 हजार 136 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी 1 हजार 667 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. यामध्ये 80 कोटी 1 लाख 72 हजार 570 रुपये वसूली करण्यात आली. तसेच वादपूर्व 19 हजार 175 प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी एकूण 11 हजार 510 प्रकरणे निकाली निघून 5 कोटी 30 लाख 43 हजार 204 रुपयांची वसूल करण्यात आली. लोकअदालतीमध्ये एकूण 13 हजार 177 प्रकरणे तडजोडीने निघाली. तसेच 7 ते 11 मार्च 2022 या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्हमध्ये सातारा जिल्ह्यात एकूण 1 हजार 28 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी एकूण 19 पॅनेल तयार करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी एक पॅनेल तयार करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे प्रकरणे, कर्ज धनादेश न वठल्याचे प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी पक्षकार, विधिज्ञ, सर्व न्यायिक अधिकारी, पोलीस, विधी स्वयंसेवक आणि सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.