आता भोंगे लावूनच करणार हनुमान चालीसाचे पठण ; राज ठाकरेंच्या भूमिकेचे नवनीत राणांकडून समर्थन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील वाजवल्या जाणाऱ्या भोंग्यांना विरोध करत भोंगे उतरवा अन्यथा मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवू असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. “येत्या हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जाऊन मी आणि आमदार रवी राणा आम्ही दोघेही हनुमान चालीसाचे पठण करणार आहोत. तसेच हनुमान मंदिरावर भोंगा देखील लावणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हंटले आहे.

याबाबत माहिती देताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, हनुमान चालीसा वाचणे ही काही माझी पहिली वेळ नाही. मी अनेक वेळा हनुमान चालीसा वाचली आहे. आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचे काम करत आहे. उद्या हनुमान जयंती आहे. त्यानिमित्ताने रवी राणांसोबत हनुमान चालीसा पठण करणार आहे. शिवाय भोंगेही वाजविणार आहे. मनसेला हनुमान चालीसा वाचण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. आता उद्या हनुमान जयंती आहे. यानिमित्त आम्हीही भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करणार आहोत.

राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसेचे पठणही करण्यात आले. त्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत अशाच एक इशारा दिला आहे. त्यांनी यापूर्वीही हजारो महिलांसोबत हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसेचे पठण केले होते.

दरम्यान, हनुमान जयंती निमित्ताने पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचावी – रवी राणा

हनुमान चालीसाबाबत अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरे हिंदू असतील तर त्यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी, असे थेट आव्हानच राणा यांनी आज केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण हनुमान चालीसा वाचणार असेही राणा यांनी म्हंटले आहे.