नक्षलवाद्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी । पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील दोन नागरिकांची हत्या केली आहे. मासू पुंगाटी(५५) व ऋषी मेश्राम(५२) अशी मृतांची नावे आहेत. मासु पुंगाटी हे गाव पाटील, तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

काल रात्री सशस्त्र नक्षलवादी पुरसलगोंदी गावात गेले. त्यांनी मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम यांना गावाबाहेर नेऊन त्यांची गोळ्या घालून हत्या केली. आज सकाळी पुरसलगोंदी-आलेंगा रस्त्यावर दोघांचे मृतदेह आढळून आले. पुरसलगोंदीनजीकच्या सुरजागड पहाडावर लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीने लोहखनिज उत्खननाचे काम सुरु आहे. मध्यंतरी हे काम बंद होते. परंतु आता पुन्हा काम सुरु झाले आहे. नक्षल्यांचा विरोध असतानाही कंपनीने उत्खननाचे काम सुरु केले असून, मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम यांनी उत्खननास समर्थन दर्शविले होते. त्यामुळै त्यांची हत्या झाल्याची चर्चा आहे.

शिवाय अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पचीही नक्षल्यांनी नासधूस केली आहे. या ठिकाणी वनविभागाने अनेक हत्ती पाळले असून, पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु नक्षल्यांनी तेथे नासधूस केल्याने पर्यटकही भयभीत झाले आहेत. तसेच आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडा गावाजवळ झाडे आडवी टाकून नक्षल्यांनी रस्ता अडविला होता.

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री कोरची तालुक्यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या १७ वर्षीय युवकाची गोळ्या घालून हत्या केली होती. तसेच अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ झाडे आडवी टाकून व बॅनर बाधून रस्ता अडविला होता. त्यानंतर ३० नोव्हेंबरच्या सकाळी भामरागड तालुक्यातील लाहेरी पलिकडील अबुझमाड जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले होते, यामुळे नक्षली आणखीनच खवळले आहेत. दरम्यान पोलिसांनी रेड अलर्ट जारी केला असून, सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मासू पुंगाटी हा पोलिस पाटील नव्हता, तर नक्षलसमर्थक म्हणून त्याची पोलिस दप्तरी नोंद असल्याचे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी जारी केले आहे.

Leave a Comment