हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र पोस्ट केले आहे. “सर्वोच्च न्यायालयात माझी याचिका सुनावणीसाठी असतानाही त्यापूर्वीच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. मला सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम दिलासा दिलेला आहे. जर गरज असेल तर मला अटकपूर्व जामीन देण्याचेही कोर्टाने म्हंटले आहे. सत्यमेव जयते,” असे देशमुख यांनी पत्रात म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीपूर्वी एक पत्र पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी शेवटी सत्याचाच विजय होतो, असे म्हंटले आहे. या पत्रात देशमुख म्हणतात की, मी माझे संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मी आयुष्य जगलो आहे. त्यामुळेच माझ्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणतेही आरोप झालेले नाहीत. माझे आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखे आहे. त्यात काहीच लपवून ठेवलेले नाही. परंतु, माझ्यावर काही लोकांकडून आरोप झाले. ज्यांची काहीच नैतिकता किंवा विश्वासहार्यता नाही अशा लोकांनी माझ्यावर आरोप केले.
Satyamev Jayate 🙏 pic.twitter.com/q8q59BvsSV
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 1, 2021
काही तरी हितसंबंधातून हेतूपरत्वे हे आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप खोटे आहेत. ज्या व्यक्तीने हे आरोप केला, तोच कर्तव्यावर असताना खंडणी वसूल करायचा. फ्रॉड करायचा आणि खुनाच्या गुन्ह्यातही असल्याचे दिसून येते. तर माझ्यावर आरोप करणारा मुंबईचा माजी पोलीस आयुक्तच एका प्रकरणात फरार आहे. माझ्यावर झालेले आरोप हे निराधार आहेत. हे मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. माझी चौकशी अत्यंत निष्पक्षपातीपणे होईल अशी आशा आहे. मी चौकशीला संपूर्णपणे सहाकार्य करेन, असे देशमुख यांनी पत्रात म्हंटले आहे.