राष्ट्रवादीला धक्का; परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांनी अचानकपणे राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून दुराणी यांनी नेमका का राजीनामा दिला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान पक्षाअंतर्गत राजकारण आणि गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

बाबाजानी दुर्रानी यांची काही दिवसांपासून पक्षातील स्थानिक नेत्यांबाबत नाराजीही होती. पक्षात असलेला अंतर्गत वाद आणि गटबाजी यालाच कंटाळून बाबाजानी दुर्रानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या काळात स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीच बाबाजानी दुर्रानी यांनी राजानामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा एक झटका असल्याचं बोललं जात आहे. बाबाजानी दुर्रानी यांच्या राजीनाम्यामुळे येत्या निवडुकांत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

18 नोव्हेंबरला बाबाजानी यांना मारहाण-

आमदार बाबाजानी दुर्राणी यांना 18 नोव्हेंबर रोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ते चर्चेत होते. दुर्राणी हे पाथरीतील कबरस्थान परिसरात समर्थकांसह उभे होते. यावेळी शहरातील मोहम्मद सईद या इसमाने दुर्रानी यांच्यासोबत वाद घालत त्यांच्या श्रीमुखात भडकावली. या प्रकाराने बाबाजानींचे समर्थक संतप्त झाले होते. ते हल्लखोराला धडा शिकवण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, दुर्राणी यांनीच त्यांना आवरले. त्यामुळे पुढचा राडा टळला. याप्रकरणी दुर्राणी यांच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी पाथरी बंदची हाक दिली. त्यानंतर आता दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.