‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, हसन मुश्रीफांचा सूचक इशारा

कोल्हापूर । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतीळ नेते खडसे यांच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत. अशातचं राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यावर सूचक विधान केलं आहे. ‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपमधील आणखी काही नाराज नेते लवकरच राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (hasan mushrif on eknath khadse resign)

हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं. एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, असं सांगतानाच आगामी काळात भाजपमध्ये गेलेले काठावरचे अनेक नेते राष्ट्रवादीत येतील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढण्यात मदतच होणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. मुश्रीफ यांनी भाजपमधील अनेकजण राष्ट्रवादीत येणार असल्याचं सांगितल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’
दरम्यान, काल काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनीही ट्विट करून ‘ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है’, असं सांगून खळबळ उडवून दिली होती. . एकनाथ खडसे यांचा भाजपचा राजीनाम्यातून भाजपची कार्यशैली उघड झाली आहे. अभी तो ये शुरूवात है. ट्रेलर शुरू हुआ है, पिक्चर तो अभी बाकी है, असं सातव म्हणाले होते. दरम्यान, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंच्या भाजपमधील राजकीय भूकंपाची घोषणा केली होती. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत. त्यांचा पक्षप्रवेश रात्रीच्या अंधारात नव्हे तर उजेडात होईल, असं जयंत पाटील म्हणाले होते. (hasan mushrif on eknath khadse resign)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”