राज्यात लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले..

मुंबई । देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्गावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, राज्यात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॉकडाऊनबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

येत्या २९ तारखेला आम्ही राज्यातील लॉकडाऊनच्या स्थितीचा आढावा घेऊ. बरीच स्थिती आटोक्यात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जिथे कोविड रुग्ण नाहीत किंवा अगदी कमी आहेत, तेथील व्यवहार सुरळीत करण्याबाबत विचार करू असे पाटील म्हणाले. पण जिथे रुग्ण जास्त आहेत तिथे शिथिलता दिली जाणार नसल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन ४ सुरु आहे. पण राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊन हा शब्दप्रयोग न करता काही गोष्टी कशा पुर्वपदावर आणता येतील याचा विचार करुया असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केले होते. दरम्यान राज्यातील लॉकडाऊन वाढणार की नाही हा प्रश्न विचारला जातो आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”