देशात महागाईचा भडका उडालाय पंतप्रधान गप्प का? शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात सध्या पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी शंभरी पार केलेली आहे. इंधनासह गॅसचेही दर वाढले असल्याने देशात महागाईचा भडकाही उडालेला आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “देशात महागाईचा भडका उडाला असताना पंतप्रधान मात्र, काहीही बोलायला तयार नाहीत. ते गप्प का आहेत? असा सवालही पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपरी चिंचव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दररोज पाहिले तर एक बातमी पक्की असते ती म्हणजे आज पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती किती वाढल्या, आपल्या भगिनींच्या संसाराचं बजेट कसं कोलमडून पडलेय. या मोदी सरकारमुळे मोठ्या प्रमाणात महागाईत वाढ झालेली आहे. मनमोहन सिंग यांचे सरकार होते तेव्हा आजच्या सत्तेतील भाजपमधील लोकांनी आंदोलन करत लोकसभा सभागृह बंद पाडले होते.

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या आजच्या लेखात त्यांनी सांगितले आहे की, 25 टक्के कर जरी केंद्र सरकारने कमी केला तर वाढलेल्या डिझेल, पेट्रोलच्या किंमत कमी होतील. पण केंद्र सरकार तसे करताना दिसत नाही. महाराष्ट्रातील लोकांची सुख-दुःख समजावे, हे केंद्र सरकार सांगण्यासाठी मी जिल्ह्या जिल्ह्यात जातो आहे. राज्यात जिथं जाणं शक्य आहे तिथं जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

You might also like