आघाडी सरकारला नामोहरण करण्यासाठी धाडसत्र सुरु; जयंत पाटलांची भाजपवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना ईडी, एलसीबीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. या दरम्यान आज आमदार रोहित पवार यांनी गौप्यस्फोटही केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. महाविकास आघाडी सरकारला नामोहरण करण्याचे काम भाजपकडून केले जातेय. म्हणून तर भाजपकडून अशा प्रकारचे धाडसत्र सुरु करण्यात आलेले आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून अनेक प्रकार अवलंबले जात आहेत. हे सरकार पडत नाही म्हणून बदनाम केले जात आहे. ईडी, आयटीने ज्यांचे अनधिकृत धंदे आहेत त्यांच्या मागे लागले पाहिजे. म्हणून तराजकारणातील मागील दहा ते पंधरा वर्षांपूर्वीची जी प्रकरणे आहेत. ती बाहेर काढायची आणि त्यांच्या मागे लागायचे अशी कामे केंद्र सरकार करत आहे. दोन वर्षापासून सरकार कोसळणार असल्याचं ऐकत आहोत. पण आमचं सरकार स्थिर आहे. सरकार अस्थिर असते तर आम्ही मुंबईत राहून सरकार टिकवण्याचे प्रयत्न केले असते. तशी वेळ आमच्यावर अजून आलेली नाही, असे पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर टीका केली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली असे पवार यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment