खंडाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अश्विनी पवार बिनविरोध

खंडाळा | खंडाळा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील याच विराजमान आहेत.

खंडाळा पंचायत समिती सभापती पदाची निवड किसनवीर सभागृह याठिकाणी वाईचे प्रांताधिकारी तथा पिठासीन अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांनी सहकार्य केले. खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरलेल्या सूत्रानुसार सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्याकडे सभापतीपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदासाठी निवडणूक झाली.

सभापती राजेंद्र तांबे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसभापती वंदना धायगुडे-पाटील यांची हंगामी सभापतीपदी नेमणूक करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद मोटे, राजेंद्र तांबे, अश्विनी पवार हे तीन सदस्य असून काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील व अपक्ष म्हणून चंद्रकांत यादव, शोभा जाधव असे सहा संख्याबळ आहे. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील यांना बरोबर घेत वंदना धायगुडे-पाटील यांना उपसभापतीपद बहाल केले आहे. तर सुरवातीला राष्ट्रवादीचे ठरलेल्या सूत्रानुसार व वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या मान्यतेने पंचायत समिती सदस्य मकरंद मोटे, राजेंद्र तांबे यांना सभापतीपद तर आत्ता पंचायत समिती सदस्य अश्विनी पवार यांना संधी दिली आहे.

यावेळी खंडाळा पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंचायत समिती सदस्या अश्विनी पवार यांनी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्याकडे विहीत मुदतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र तांबे, मकरंद मोटे तर काँग्रेसच्या वंदना धायगुडे-पाटील ह्या उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे विरोधी गटातील अपक्ष उमेदवार चंद्रकांत यादव यांनीही सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान,उमेदवारी माघारी घेण्याच्या मुदतीमध्ये अपक्ष चंद्रकांत यादव यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केली. यावेळी नूतन सभापती अश्विनी पवार यांचा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र तांबे, मकरंद मोटे, अपक्ष चंद्रकांत यादव, शोभा जाधव आदी उपस्थित होते.

You might also like