अमरप्रीत चौकात उड्डाणपूलाची गरज – खा. जलील

औरंगाबाद | चिकलठाणा विमानतळ ऐवजी शहरातील अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. अमरप्रीत चौक आणि आकाशवाणी या ठिकाणी वाहतूकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या दोन ठिकाणी उड्डानपुल करा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘शहरातील सर्वपक्षीय आमदारांनी मंत्री गडकरी यांना पत्र पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. जालना रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जागेवर कॉम्प्लेक्स बांधल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात राजू तनवानी, जुगलकिशोर तापडिया, दर्ग्याचे मुतव्वली, बाफना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा ठराव 25 जून रोजी होणाऱ्या बैठकीत मंजूर केला जाईल. शहरातील लॉकडाऊनला मी विरोध केला होता त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले. अधिकारी कोणाच्या दबावाखाली रात्री बारा वाजता गंभीर गुन्हे दाखल करतात. हे लवकरच स्पष्ट होईल. हा प्रश्न मी लोकसभेत उपस्थित करणार आहे. दिल्ली व उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत आमचा पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरेल’ असे इम्तियाज जलील म्हणाले.

दोन वर्षापूर्वी सुद्धा तत्कालीन प्रकल्प संचालक पी.डी. गाडेकर यांना सविस्तर माहिती देऊन उड्डाणपूल बांधण्याची प्राथमिकता निर्देशांकआणून दिली होती. पत्रात नमूद करण्यात आले की, 2015 मध्ये सर्विस रस्ते, पथकांसह बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये विविध ठिकाणी उद्यानातून सायकल ट्रॅकचा समावेश करून सुमारे 400 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला होता. परंतु सध्या स्थितीत फक्त 70 कोटी इतक्या कमी व मर्यादित मान्यता देण्यात आली आहे. त्यामधून सर्विस रोड, सायकल ट्रॅक इत्यादी सुविधा वगळण्यात आलेले आहे. औरंगाबाद शहराचे सध्याचे वस्तुस्थिती लक्षात घेता, चिकलठाणा विमानतळा ऐवजी अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यात यावा. मुख्य बाजारपेठेकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे येथे उड्डाणपुलाची आवश्यकता आहे.