Wednesday, June 7, 2023

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित  

टीम, HELLO महाराष्ट्र । पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला आज विशेष प्रतिबंधक कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. पीएमएलए कोर्टाने हा निकाल दिला आहे. तसेच नीरव मोदी यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत. निरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघड होताच भारतातून पळून गेलेल्या नीरव मोदीला या बँकेनेच बेकायदा मदत केली केली होती असे फॉरेन्सिक ऑडिटमधून उघड झाले होते.

बेल्जियममधील प्रख्यात बीडीओ या ऑडिट कंपनीकडे फॉरेन्सिक ऑडिटचे काम सोपविण्यात आले होते. तिने आतापर्यंत ५ अंतरिम व एक अंतिम अहवाल पीएनबीला सोपविला आहे. त्यात या बेकायदा हमीपत्रांचा उल्लेख आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत सुरू आहे. तेथील आर्थिक व्यवहाराच्या तपासणीचे काम पंजाब नॅशनल बँकेनेच बीडीओ या ऑडिट कंपनीकडे सोपविले होते. त्यात पीएनबीने २८ हजार कोटी रुपयांची १५६१ हमीपत्रे नीरव मोदीला दिली होती, असे दिसून आले. त्यापैकी तब्बल २५ हजार कोटी रुपयांची १,३८१ हमीपत्रे बेकायदेशीर पद्धतीने दिली होती.

आपल्या अहवालात बीडीओ कंपनीने नीरव मोदीकडील १५ महागड्या कार्स, एक बोट, १0६ अत्यंत महाग अशी पेटिंग्ज आदींचा उल्लेख केला आहे. एम. एफ. हुसैन, राजा रवी वर्मा, जामिनी रॉय आदींच्या या कलाकृती आहेत. या सर्वांची किंमत सुमारे २0 कोटी रुपये आहे.