8 महिन्यांपासून वेतन थकवल्याने सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोना साथीच्या संकटकाळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत सफाई कामगारांनीदेखील आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले आहे. कमी पगार असूनदेखील सफाई कामगारांनी शहराला स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्यातच आता कंत्राटी सफाई कामगाराला आत्महत्या करावी लागली आहे. मागच्या आठ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने निलंगा नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगाराने नगर परिषदेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

आत्महत्या केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव बाबुराव नामदेव गायकवाड आहे. मृत गायकवाड यांना मागच्या आठ महिन्यांपासून पगार देण्यात आला नव्हता. आधीच कोरोनाची महामारी आणि त्यामध्ये आठ महिन्यांचा पगार थकवल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. बाबुराव नामदेव गायकवाड यांनी निलंगा नगरपरिषद आवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत बाबुराव गायकवाड हे गेल्या 35 वर्षापासून निलंगा नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून काम करत होते.

निलंगा नगरपरिषदेत सध्या 36 सफाई कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत, तर 70 कर्मचारी हे कंत्राटी स्वरुपात काम करत आहेत. या 70 कंत्राटी कामगारांचे नियंत्रण एका खासगी एजन्सीला दिले गेले होते. निलंगा नगरपरिषदेने या एजन्सीला सर्व बिले दिली आहेत. असे असूनदेखील एजन्सीने मागील काही महिन्यांपासून कामगारांचे वेतन थकवले आहे. आज सकाळी बाबुराव गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण शहरात पसरली. यानंतर अनेक कामगारांनी नगर परिषदेच्या आवारात एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कंत्राटदार यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह झाडावरुन खाली काढू देणार नाही, अशी भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली होती. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केले.

Leave a Comment