मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे हताश पित्याने उचललं ‘हे’ पाऊल

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील दुधाळा याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे एका हताश पित्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. औंढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

या मृत शेतकरी पित्याचे नाव विठ्ठलराव अमृतराव पोले असे आहे. ते औंढा तालुक्यातील दुधाळा येथील रहिवाशी होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या शेतात नापिकी होती. अतिवृष्टीमुळे त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे गेल्या काही काळापासून त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. अशामध्ये बोळवणीसाठी मुलींना कपडे घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते.

याच विवंचनेतून त्यांनी घरात ठेवलेलं कापूस फवारणीचं औषध प्राशन केलं. पोले यांनी विष प्राशन केल्याची माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. केवळ मुलींना कपडे घेण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणातून वयोवृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You might also like