हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना अश्लील मेसेज पाठवणे आणि कॉल करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी (Maharashtra Nodal Cyber Police) ही कारवाई केली आहे. अमोल काळे (Amol Kale) (वय 25) असं सदर आरोपीचे नाव असून त्याला पुण्यातील भोसरीतून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. आरोपीने पंकजा मुंडेंना अश्लील भाषा का वापरली? त्याच्या या कृत्यामागील नेमका हेतू काय होता याचा तपास पोलीस करत आहेत…
याबाबत अधिक माहिती अशी कि, अमोल काळे हा गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून त्रास देत होता. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकांत संपर्क करुन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम 78 आणि 79 तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला होता. पोलिसांनी आरोपी अमोल काळेच्या मोबाईलचे लोकेशन शोधून काढले. लोकेशनच्या माध्यमातून तो पुण्यातच असल्याचं स्पष्ट झालं… त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अमोल काळेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी अमोल काळे पोपटासारखा बोलू लागला. आपणच पंकजा मुंडे यांना अश्लील मॅसेज व कॉल करत असल्याचे कबूल केले.
अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी आहे . त्याने अश्लील भाषा का वापरली, तसेच त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील त्याचा हेतू काय याचा तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे, असे नोडल सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अमोल काळे या आरोपीला जरी पुण्यातील भोसरी येथे अटक करण्यात आली असली तरी तो मूळचा पंकजा मुंडेंच्या परळी येथील असल्याचं समजते.