सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पडत असलेल्या पावसामुळे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. ठोसेघर येथील डोंगराच्या कुशीत वाहणारा ठोसेघर धबधबा कोसळू लागला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यासह राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहेत. मात्र, आता वनविभागाच्या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. तेव्हा पर्यटकांनी ठोसेघरला प्रेक्षक गॅलरीतून धबधब्याचे निसर्गरम्य साैंदर्य अनुभवता येणार नाही.
सातारा जिल्ह्यातील किंवा राज्यातील नव्हे तर देशभरातून ठोसेघर धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. या ठिकाणी अनेकदा दुर्घटना घडल्या असून जवळपास 10 जणांनी आपला जीव गमवला आहे. वनविभागाने या दुर्घटना टाळण्यासाठी धबधब्याच्या वरील बाजूस पर्यटकांना बंदी घातली अन् संरक्षक जाळी मारली. मात्र, यामुळे काहीकाळ ठोसेघरला येणाऱ्या पर्यटकाचा हिरमोड होवू लागला होता, तेव्हा वनविभागाने प्रेक्षक गॅलरी उभारून पर्यटकांना एक अदभुत ठोसेघरचा नजारा पाहण्यासाठी खुला केला होता. प्रेक्षक गॅलरीतून ठोसेघर व अजूबाजूचे निसर्ग साैंदर्य अनुभविण्यासाठी पावसाळ्यात दररोज हजारो पर्यटक हजेरी लावत आहेत. परंतु आता वनविभागाने ही प्रेक्षक गॅलरी पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पावसाळा सुरू असून या हंगामामध्ये लाखोच्या संख्येने पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येत असतात. ठोसेघर, भांबवली, सडावाघापूर, सांडवली, केळवली हे धबधबे पर्यटकांना नेहमी आकर्षित करत आहेत. ठोसेघर येथे सोळा वर्षांपूर्वी बांधलेली प्रेक्षक गॅलरी बंद केल्याने पर्यटकांना धबधबा पाहण्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा लवकरात लवकरच ही गॅलरी दुरुस्त करावी, अशी मागणी पर्यटकांच्यातून केली जावू लागली आहे.