शेतीतील रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबातील तुंबळ हाणामारीत एकाची हत्या; एकजण जखमी

औरंगाबाद : शेतीच्या रस्त्याच्या वादावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री कचनेर जवळील घारदोन मध्ये घडली.या प्रकरणी दुपारपर्यंत चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. माणिक दादा नवपुते वय-65 (रा.घारदोन, कचनेरजवळ, ता.जि. औरंगाबाद) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.

या प्रकरणी दुपारपर्यंत मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत नवपुते यांची घारदोन परिसरात शेती आहे. ते आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच शेतीवर होत असे. त्यांची मुले व सर्व परिवार शेती करत होते. त्यांच्या शेजारी नात्यातीलच नातलगांची देखील शेती आहे. मात्र दोन्ही कुटुंबात शेतातील रस्त्याच्या कारणावरून वाद होता .त्यामुळे नेहमीच कुरबुर होत होती. शनिवारी रात्री देखील शेतातील रस्त्यावरून वाद पुन्हा सुरू झाला. दोन्ही परिवारातील सदस्य समोरासमोर आल्याने वाद विकोपाला गेला व तुंबळ हाणामारी सुरू झाली. या मारहाणीत नवपुते यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. व ते खाली कोसळले. त्यांना तातडीने त्यांच्या मुलाने व इतर नातलगांनी रात्री घाटी रुग्णालयात हलविले. मात्र उपचार सुरू असताना रात्री 11च्या सुमारास नवपुते यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

जोपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाहीत तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातलगांनी घेतला होता. पोलिसांनी नातलगांनी समजूत घातली. दुपारपर्यंत मृतांच्या नातलगांच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर मृतदेहावर दुपार पर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. या प्रकरणी निरीक्षक विश्वास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सध्या फिर्याद घेणे सुरू आहे. गुन्हा दाखल करून लवकरच आरोपी अटक करण्यात येईल अशी माहिती पाटील यांनी दिली.