Monday, January 30, 2023

कराड भाजी मंडई खून प्रकरणी अजून एकास अटक

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

येथील भाजी मंडईत मंगळवारी रात्री झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. आरबाज फिरोज बेपारी वय 22 रा. भाजी मंडई, गुरुवार पेठ, कराड असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक केलेल्या तीन संशयितांना पोलिसांनी शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुर्ववैमनस्यातून मंगळवारी रात्री भाजी मंडईतील कुरेशी मोहल्ल्यात जुबेर जहाँगिर आंबेकरी याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. मृत जुबेर आंबेकरी हा कुरेशी मोहल्ल्यात वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री तो मोहल्ल्यात असताना तीन युवकांशी त्याचा वाद झाला. या वादावादीवेळी संबंधित युवकांनी धारदार शस्त्राने वार करून तसेच फरशी डोक्यात घालून जुबेरला गंभीर जखमी केले. त्यानंतर ते तिघेही तेथून पसार झाले.

गुरूवारी सकाळी हे तिघेजण पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून कर्नाटकला जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून वारूंजी फाटा येथील माऊली हॉटेल परिसरातून या तिघांना ताब्यात घेतले. तर अरिन सय्यद, सईद शिकलगार या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यात शुक्रवारी आरबाज फिरोज बेपारी या चौथ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’