रागाने बघितल्याच्या कारणावरून एकास दगड, काचा भरलेल्या पिशवीने मारहाण

कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील वारूंजी फाटा येथे रागाने बघितल्याच्या कारणावरून दोघांनी एकास हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण करून दगड व काचा असलेली पिशवी डोक्यात घालून रक्तबंबाळ केल्याची घटना गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद प्रतिक भाऊ सकटे (वय 21, रा. लक्ष्मी वार्ड वारूंजी, ता. कराड) याने शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मानव शंकर कट्टमनी, इब्राहीम मेहबुब शेख दोघेही (रा. लक्ष्मी वार्ड वारूंजी, ता. कराड) असे गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी प्रतिक सकटे याचा वारूंजी फाटा येथे सरबताचा गाडा आहे. गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रतिक गाड्यावर काम करत असताना तेथे मानव व इब्राहीम तेथे आले. व प्रतिक यास तु आमच्याकडे रागाने का बघितलेस असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारू लागले. त्यावेळी मानव याने त्याच्या हातात असलेली पिशवी प्रतिकच्या डोक्यात घातली. त्यामुळे प्रतिकच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर मानव व इब्राहीम हे पिशवी तेथेच टाकून निघून गेले.

त्यानंतर प्रतिक याने पिशवी पाहिली असता त्यामध्ये लहान दगड व काचेची फुटलेली बाटली आढळून आली. याबाबत प्रतिक सकटे याने शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देवा खाडे करीत आहे.

You might also like