शेतकऱ्यांनंतर व्यापारी मोदी सरकारविरोधात आक्रमक; राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वधारले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मनमाड-बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे. तर पिंपळगाव-बसवंतमध्येही व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रद्द केले आहेत.

मोदी सरकारने कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास असमर्थता दाखवली आहे. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खरेदी केलेला कांदा पडून असल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. लिलावात सहभागी होणार नसल्याचंही व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱ्यांनीच कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. केंद्राने अवघ्या 25 टनापर्यंत कांद्याला साठवणीकरता परवानगी दिली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे.

दरम्यान, देशातील बर्‍याच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदासुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांना रडवणार आहे. जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर भडकण्याची चिन्ह आहेत. किरकोळ बाजारात सध्या कांदा 40-50 रुपये किलोनं मिळतोय. देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगाव येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचा भाव प्रति क्विंटल 6802 रुपयांवर पोहोचला होता. कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. (Onion auction closed market committees )

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment