Tuesday, January 31, 2023

फेसबुकवरच्या मैत्रीमुळे पुण्यातील महिलेला ४ कोटींचा गंडा

- Advertisement -

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोण कशी फसवणूक करेल सांगता येत नाही. आता तर ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसवणूक करणारे लोक ठराविक लोकांना टार्गेट करून फसवणूक करतात. अशीच एक घटना पुणे येथे घडली आहे. यामध्ये ६० वर्षीय महिलेला ४ कोटींचा गंडा घालत तिची फसवणूक केली आहे. हि महिला पुण्यातील एका खाजगी कंपनीमध्ये वरिष्ठ कार्यकारी म्हणून काम करते.

महिलेची फसवणूक करून हडप करण्यात आलेली रक्कम मागील काही महिन्यांमध्ये २७ वेगवेगळ्या खात्यांमध्ये गेली आहे.यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे ४ कोटीमधील ३.९८ कोटी कोटीची रक्कम २०७ ट्रान्जेक्शनमधून उडवण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सायबर सेलचे पोलीस अधिकारी अंकुश चिंतामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये या महिलेला ब्रिटनमधील फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने महिलेसोबत मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या व्यक्तीने महिलेच्या वाढदिवशी भेटवस्तू म्हणून एक आयफोन पाठवला आहे असे सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर या व्यक्तीने दिल्ली विमानतळावर गिफ्टवर असलेले सीमा शुल्क क्लियर करण्याच्या बहाण्याने महिलेकडे मोठ्या रकमेची मागणी केली. या व्यक्तीने स्वतःच महिलेला कूरिअर एजन्सी आणि कस्टम अधिकारी बनून फोन करून ब्रिटनहून आलेल्या पार्सलमध्ये ज्वेलरी आणि विदेशी करंसी असल्यामुळे त्या महिलेला अधिक सीमा शुल्क भरावा लागेल असे सांगितले. या व्यक्तीने सप्टेंबर २०२० पासून आतापर्यंत या महिलेची ३,९८,७५,५०० रुपयांची फसवणूक केली आहे. यानंतर महिलेने सायबर सेलला संपर्क केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. यानंतर तिने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.