औरंगाबाद – जिल्ह्यासह मराठवाड्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी सोमवारी आणखी कमी झाल्याचे नोंदवले गेले. मराठवाड्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1471 वर पोहोचली. तर कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाले. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने काहीशी चिंता वाढली तर कोरोना रुग्णसंख्या तीनशेच्या आतच रोखली गेल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला. जिल्ह्यात सोमवारी 290 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर जिल्ह्यात 5814 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरीही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सक्ती कायम राहिल, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात आता कोणते नवे नियम?
– जे नागरिक लस घेणार नाहीत, त्या कुटुंबाला फेब्रुवारी महिन्याचे रेशन न देण्याचा निर्णय सोमवारी टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला.
– घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनी लस घेतलेली असेल तरच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लस घेतलेली नसेल तर जागेवरच लसीकरण करून उपचाराचा मार्गही मोकळा करुन दिला जाईल.
– 03 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी सुरु होईल.
– घाटी रुग्णालयातील आतररुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही लसीची विचारणा करण्यात येईल. लसीचा किमान एक डोस बंधनकारक आहे.
– अपघात विभागात येणाऱ्या गंभीर रुग्णांसाठी मात्र लसीची सक्ती करण्यात येणार नाही. तसेच लस घेतलेल्या नातेवाईकांनाच रुग्णांना भेटण्याची परवानगी असेल.
– जिल्ह्यात ज्या भागात लसीकरण कमी आहे, त्या भागातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
– व्हॅक्सिनेशन ऑन व्हील अंतर्गत ज्या भागात लसीकरण कमी आहे, त्या भागात हे वाहन नेण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
– जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असून, एकूण रुग्णांपैकी जे रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते, अशा रुग्णांची केस स्टडी करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत.