पाचगणी | पालिकेच्या कामामध्ये मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी अनियमितता तसेच कर्तव्यात कसूर केल्याबाबत उपनगराध्यक्ष अनिल लक्ष्मण सावंत यांनी नगरविकास विभागाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल, दि. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत प्राधान्याने सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अप्पर सचिव प्रतिभा पाटील यांनी कळविले आहे.
उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दि. 29 जुलै 2021 रोजी मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या विरुध्द मनमानी कारभार कर्तव्यात कसूर केल्याबाबत नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर दि.28 जानेवारी 2020 रोजीच्या ठराव क्र. 25 मध्ये फेरफार करुन, तज्ञ वास्तुविशारद यांच्या सल्ल्याची फी म्हणून जादा बील अदा करणे. पालिकेच्या हद्दीमध्ये स्वत:चे मजुरासह ट्रॅक्टर ट्रॉली सहाय्याने स्वत:ची जंतूनाशके वापरुन फवारणी करणे, यासाठी निविदा प्रणालीद्वारे द्वी – लखोटा पध्दतीने निविदा मागवून, वर्तमानपत्रात ई-निविदा सूचना प्रसिध्द केल्याबाबत नमूद करुन प्रत्यक्ष तशी कार्यवाही न करता पालिकेच्या सभेची मंजूरी न घेता कार्यवाही करणे. जिल्हाधिकारी यांची आवश्यक प्रशासकीय मंजूरी न घेता कचरा संकलन घंटा गाड्यांची बेकायदेशीर खरेदी करणे.
न्यायालयीन प्रकरणे चालवण्यासाठी वकिलांची फी कोणतीही मंजूरी न घेता अदा करणे. इतिवृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करणे. ऑडिट रिपोर्ट सभागृहापुढे सादर न करणे. मंजूर निधीचा योग्य त्या कालावधीमध्ये वापर न करणे, मुख्याधिकारी हे मुख्यालयात न राहणे, तसेच नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व इतर काही नगरसेवक या सर्वांसोबत संगनमत करुन मनमानी कारभार करणे. कर्तव्यात कसूर केल्याबाबत तक्रार करून योग्य कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास विभागाने मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या कारभाराची चौकशी करावी आणि तसा स्पष्ट अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.