चंद्रकांतदादांचं चाललंय काय ?? काश्मीरची बोंब मारल्याशिवाय जमतच नाय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । शुभम भोकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात चंपा नावाने लोकप्रिय होत असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नवनवीन कल्पना सामान्य नागरिकांच्या भुवया उंचावत आहेत. गुजरातमध्ये अधिक काळ सक्रिय राहून अमित शहा आणि नरेंद्र मोदींचं काम केलेल्या चंद्रकांतदादांना अल्पावधीतच महाराष्ट्र राज्याची राजकीय जहागिरी बक्षीस म्हणून मिळाली आहे. राज्यातील क्रमांक २ चा नेता आणि भावी मुख्यमंत्री अशी प्रतिमा सध्या चंद्रकांतदादांची बनली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीला पोखरत घड्याळाची टिकटिक बंद पडून तिथं कमळ फुलविणाऱ्या चंद्रकांतदादांना विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मात्र चांगलंच जोरावर धरलं जातंय.

लोकसभा निवडणुकीला कोथरूड विधानसभा क्षेत्रातून लाखभर मतांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिल्यामुळे मेधा कुलकर्णींना त्याचं बक्षीस म्हणून आमदारकी गमवावी लागली. चंद्रकांत पाटलांच्या जातीचा उल्लेख करून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने यात आणखीच तेल ओतलं. पुण्यातील सुज्ञ नागरिकांनी पुणेरी पाट्या वापरत बाहेरचा उमेदवार आम्हाला नको असा संदेशही चंद्रकांत दादांपर्यंत व्यवस्थित पोहचवला. या सगळ्यांपुढे जाऊन ज्या मुद्द्याचं राजकारण महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजप बाहेर काढेल, तेच चंद्रकांतदादांनी सुरु केलं आहे.

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा भावनिक मुद्दा कोथरूडमधील जनतेपुढे मांडण्यासाठी लडाखमधील एकमेव खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना खास पुण्यात बोलावण्यात आलं आहे. उर्वरित देशवासियांना काश्मीर परिस्थितीचं भान किती आहे हीच शंका असताना स्थानिक प्रश्नांना बगल देत चंद्रकांतदादा नक्की काय साध्य करू इच्छितात ? हाच प्रश्न सामान्य पुणेकर नागरिकांना पडला आहे. दरम्यान नामग्याल यांनीसुद्धा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपण पुण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.

 

Leave a Comment