अरे बापरे …. ‘बीसीसीआय’ने भारतीय खेळाडुंचा १० महिन्यांचा पगार थकवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयला सुद्धा कोरोनाचा आर्थिक फटका बसलेला दिसतोय कारण. गेल्या १० महिन्यांपासून भारतीय संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना बीसीसीआयने मानधन दिलं नसल्याची बाब समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलंय. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या २७ खेळाडुंना प्रत्येक तिमाहीत श्रेणीनुसार मानधन अदा केले जाते. मात्र, गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून या सर्व खेळाडुंना पगार आणि सामना शुल्क मिळालेच नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला BCCI च्या बँक खात्यांमध्ये जवळपास ५०२६ कोटी रुपये आहेत. तरीही BCCI ने खेळाडुंचे मानधन दिलेले नाही. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ख्याती असलेल्या BCCI च्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बीसीसीआयच्या  अ श्रेणीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. त्यांना वर्षाला सात कोटी रुपयांचे मानधन मिळते. तर ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील खेळाडुंना वर्षाला अनुक्रमे तीन आणि एक कोटी रुपये मिळतात. याशिवाय, कसोटी, वन-डे आणि टी-२० यासाठी बीसीसीआय आपल्या खेळाडूंना अनुक्रमे १५ लाख, ६ लाख आणि ३ लाख इतके सामना शुल्क देते. परंतु, यंदा कोरोनामुळे या खेळाडुंवर संक्रांत आल्याचे चित्र आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या माहितीनुसार, डिसेंबर २०१९पासून भारतीय क्रिकेट संघ दोन कसोटी, १ एकदिवसीय आणि आठ ट्वेन्टी-२० सामने खेळला आहे. परंतु, बीसीसीआयने या सामन्यांचे शुल्कही खेळाडुंना दिलेले नाही. या सर्व थकबाकीची गोळाबेरीज केल्यास बीसीसीआयने एकूण ९९ कोटी रुपये थकवले आहेत. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे सर्व घडत असल्याचा अंदाज आहे. आयपीएल स्पर्धेतून बीसीसीआय दरवर्षी कोट्यवधी रुपये कमवते. मात्र, यंदा कोरोनामुळे IPL स्पर्धा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com