निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला निसर्ग असे नाव देण्यात आले आहे. सर्वप्रथम हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करेल आणि ३ जूनला ते उत्तर महाराष्ट्रात तसेच गुजरातकडे जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.

सध्या हा पट्टा तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात आहे त्यामुळे कोणत्याही वेळी चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. अरबी समुद्रातील हा टप्पा आज (सोमवारी) सायंकाळी पूर्ण होईल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. हे वादळ उद्यापर्यंत अधिक तीव्र होईल असेही हवामान खात्याच्या संबंधित विभागाने सांगितले आहे. २ जून ला सकाळी ते उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर आणि उत्तरपूर्वेकडे आणि नंतर उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात किनाऱ्याकडे रायगडमधील हरिहरेश्वर आणि दमनच्या पट्ट्यात वळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हे सर्व काही ३ जूनच्या संध्याकाळपर्यँत घडण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड आणि दमन मधील साधारण २६० किमीचा पट्टा येतो जो देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर,बदलापूर आणि अंबरनाथ या क्षेत्रांचा या पट्ट्यात समावेश आहे. त्यामुळे मुंबईवर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली आहे. दरम्यान नुकसान रोखण्यासाठी एनडीआरएफच्या ९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.  गृहमंत्री अमित शहा यांनी या टीमसोबत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भारतीय हवामान खात्याने ३ जूनला या चक्रीवादळाचा वेग १०५-११० किमी प्रति तास एवढा असेल असे सांगितले आहे. यामुळे किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment