पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे वृद्धापकाळाने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | येथील निंबकर अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या माध्यमातून शेतीतील प्रगत संशोधनासाठी ते अविरत कार्यरत होते. त्यांच्या विविधांगी कार्याबद्दल सन 2006 साली भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

बनबिहारी यांनी निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेती क्षेत्रात विशेष योगदान दिलं. त्यांचे शेती बियाणे व शेळी मेंढी पालन या व्यवसायामध्येही विशेष योगदान होते. तसेच 2016 रोजी जमनालाल बजाज अॅवाॅर्ड पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं. तर फलटणात 1956 साली त्यांनी शेती बियाणांमध्ये संशोधन करून ‘निंबकर सिडस्’ नावाने बाजारात आणले. 1968 रोजी निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचीही (नारी) त्यांनी स्थापना केलीय. त्यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

बनबिहारी निंबकर यांच्या निधनाने फलटणचे कृषी विद्यापीठ हरपले : ना. रामराजे नाईक- निंबाळकर

फलटणसारख्या ग्रामीण भागाची कास धरत जगाच्या नकाशावर आपल्या नावाचा आणि कामाचा ठसा उमटवणार्‍या पद्मश्री बनबिहारी निंबकर यांच्या निधनाचे वृत्त समजले. कृषी विषयक विशेषत: शेळ्या मेंढ्याच्या बाबतीत त्यांनी केलेले संशोधन हे वाखाणण्याजोगे होते. जागतिक पातळीवर त्यांचे काम हे नेहमीच आदर्शवत असे राहिलेले आहे. ते प्रसिद्धीपरामुख असल्याने फलटणकरांना त्यांच्या कामाची व्याप्ती आणि महत्व फारसे कधी जाणवले नाही. त्यांच्या जाण्याने आज फलटणकर एका जागतिक संशोधकाला मुकलेले आहेत. थोडक्यात फलटणचे कृषी विद्यापीठ हरपले असल्याचे आज मला जाणवते आहे. फलटण संस्थानचे भुतपूर्व अधिपती स्व. श्रीमंत मालोजीराजे व स्व. विष्णू निंबकर यांच्यापासून फलटणच्या राजघराण्याचे निंबकरांशी ऋणानुबंध आहेत. तीन पिढ्यांपासून असलेले हे ऋणानुबंध कायम असेच पुढेही टिकून राहतील, यात शंका नाही. निंबकर कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. पद्मश्री बनबिहारी निंबकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी श्रध्दाजंली सभापती, महाराष्ट्र राज्य विधानपरिषद, मुंबई ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाहिली आहे.

 

Leave a Comment