Monday, December 8, 2025
Home Blog Page 3719

रस्त्यावरील भंगार वाहने जप्त करण्याची मोहीम बंद

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली होती.

बुधवारी झोन 9 मधील एकूण 12 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर दोन वाहने जप्त करून गरवारे स्टेडियममध्ये तीन वाहने, उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांच्या हद्दीत ठेवण्यात आली असून इतर सात वाहने नागरिकांनी स्वतःहून काढून घेतली. त्याचबरोबर झोन 6 मध्ये 1 वाहन जप्त करण्यात आले असून चार वाहने नागरिकांनी स्वतःहून काढून घेतली. झोन 7 मधील एक वाहन जप्त करण्यात आले.

आतापर्यंत तीन दिवसांमध्ये 28 वाहनांवर कारवाई करण्यात आली 21 वाहने जप्त करून गरवारे स्टेडियम येथे जमा करण्यात आले. बरोबर महापालिकेतर्फे करण्यात आलेला बेवारस वाहणांच्या सर्वेमध्ये झोन 9 नऊ मध्ये 271 वाहने आढळून आले होते. 26 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या नियंत्रणाखाली कार्यकारी अभियंता डी. के. पंडित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्याचबरोबर ही मोहीम 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती, परंतु आजपासून ही कारवाई बंद करण्यात येणार आहे. पुन्हा अशी वाहने निदर्शनास आल्यावर कारवाई करण्यात येईल असे कार्यकारी अभियंता पंडित यांनी सांगितले.

2019 मधील महापुर, धनगर आरक्षण ते टोलमुक्तीचे आश्वासन; रोहित पवारांनी इतिहास दाखवत काढले भाजपचे वाभाडे

rohit pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध सदस्यांच्या नियुक्तीवरुन विरोधकांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. ठाकरे सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला त्यांच्या जुन्या आश्वासनांचा दाखल देत वाभाडे काढले आहेत. रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट करत भाजपला त्यांच्या आश्वासनांचा दाखला दिला आहे.

रोहित पवार म्हणाले, सदस्यांच्या जागा भरण्यास दोन दिवस उशीर होताच राजकीय पतंगबाजी साठी आतुर असलेल्या पतंगबाजांनी आपले पतंग उडवण्यास सुरवात केल्याच्या बातम्या निदर्शनास आल्या. अशा सर्व पतंगबाजांना एक सांगू इच्छितो कि आवक-जावक तारखांच्या संदर्भाने एखाद दोन दिवसाचा उशीर झाला, हे महत्वाचे नाही तर बहुतांश प्रश्न सुटायला सुरुवात झाली आहे आणि बाकीचे प्रश्न लवकरचं सुटतील असा विश्वास आहे.

सरकार परीक्षा कधी घेईल ? हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला, पुढे ढकललेल्या परीक्षा त्वरित घ्याव्यात हि विद्यार्थ्यांची देखील आग्रही मागणी होती. माझ्या माहितीनुसार कालच आयोगाने संयुक्त पूर्व परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला असून ४ सप्टेंबर रोजी हि परीक्षा होणार आहे. येणाऱ्या काही दिवसात उर्वरित परीक्षांचे देखील कार्यक्रम जाहीर होतील. शासनाच्या रिक्त असलेल्या जागांचा प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. त्या संदर्भाचा शासन निर्णय देखील ३० जुलै रोजी जारी झालेला असून विशेष बाब म्हणून हि पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दिलेला शब्द पाळला नाही, वेळ पाळली नाही याचा अर्थ देखील समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या निर्णयास दोन दिवस उशीर झाला म्हणजे शब्द पाळला नाही किंवा वेळ पाळली नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तर तीन महिन्यात आयोगाला स्वतःची जागा देऊ असं निवेदन विधान परिषदेत मार्च २०१६ मध्ये द्यायचं आणि आयोगाला जागा ऑगस्ट २०१८ मध्ये द्यायची, याचा अर्थ दिलेला शब्द पाळला नाही असा होतो.

एकीकडे निवडणुकीत शिव छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मते मागायची महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मुंबईचा नैसर्गिक अधिकार असलेले आयएफसी सेंटर शेजारच्या राज्यात हलवले जात असताना, महाराष्ट्राचे हक्काचे पाणी पळवले जात असताना, बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत असताना मात्र महाराष्ट्राच्या बाजूने भूमिका न घेता शेजारच्या राज्याची वकिली करायची, चाय बिस्कुट पत्रकार म्हणून मराठी पत्रकारांना हिणवले जात असताना दिल्लीतील दबावापोटी शांत बसायचं, याचा अर्थ दिलेला शब्द पाळला नाही असा होतो.

कोरोनाच्या काळात राज्यसरकार सोबत असल्याचं सांगायचं आणि प्रत्यक्षात मात्र दिल्ली गाठून राज्यसरकारला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करायचे, इडीला शंभर पत्र लिहायची परंतु कोरोना काळात राज्याला मदत मिळावी म्हणून एकही पत्र लिहायचं नाही, विरोधी पक्षातील नेत्यांची केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यासाठी पक्षाच्या बैठकीत ठराव करायचे परंतु केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळावी यासाठी मात्र प्रयत्न करायचे नाहीत, लस पुरवठा असो वा रेमडीसीवीर पुरवठा असो राज्यावर जाणून बुजून भेदभाव केला जात असताना राज्याची भूमिका केंद्राकडे मांडणे गरजेचे असताना राज्याची बाजू न मांडता उलट केंद्र सरकारचीच वकिली करायची याला म्हणतात दिलेला शब्द न पाळणे.

महाराष्ट्र टोलमुक्त करू असं सांगून सत्तेत यायचं मात्र सत्तेत आल्यानंतर टोलमुक्तीबद्दल एक शब्दही काढायचा नाही, संपूर्ण अभ्यास करून आलोय पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं सांगून केंद्रात राज्यात एकहाती सत्ता असताना सुद्धा त्या संदर्भात निर्णय घ्यायचा नाही, मंत्रालयात येऊन आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय न देता त्या भागात दौरा असताना त्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवायचे, याचा अर्थ दिलेला शब्द पाळला नाही असा होतो.

महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती आली असता मराठीतून ट्वीट करून राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन द्यायचं, मात्र तौक्ते वादळाच्या वेळेस शेजारच्या राज्याला त्वरित १००० कोटीची मदत जाहीर करून महाराष्ट्राला खेळवत ठेवायचं, महाराष्ट्राने निसर्ग वादळासाठी १००० कोटीचा प्रस्ताव पाठवला असता महाराष्ट्राला केवळ २६९ कोटी द्यायचे आणि इतर राज्यांना मात्र भरभरून मदत द्यायची, महाराष्ट्रात पूरस्थिती भयानक असताना देखील महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडायचं, पुराच्या संकट काळात राजकारण न करण्याची भूमिका मांडायची आणि पूरग्रस्त भागाचा दौरा करताना मात्र राजशिष्टाचार पाळला नाही म्हणून अधिकाऱ्यांवर संताप करायचा, याला म्हणतात दिलेला शब्द न पाळणे.

२०१९ च्या महापुरावेळेस महाजनादेश यात्रेत व्यस्त राहायचं, दिल्लीत राजकीय बैठका घ्यायच्या, सर्व बाजूनी टीका झाल्यावर कुठेतरी पूरग्रस्त भागात यायचं, घटनेनुसार राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांना संमती देणे आवश्यक्त असताना घटनात्मक पदावर राहूनही राजकीय भूमिका घेऊन आमदारांची नियुक्ती प्रलंबित ठेवायची याला म्हणतात वेळ न पाळणे .

अजित दादांच्या संदर्भात बोलायचे झाले तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच संध्याकाळी दादांनी तात्काळ सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि आवश्यक निर्देश दिले, रिक्त जागांचे प्रस्ताव आयोगाकडे पाठवण्यासंदर्भात देखील २८ जुलैला बैठक घेतली आणि ३० जुलै रोजी रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक असलेला जीआर काढून लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या भरतीचा मार्ग मोकळा केला हि आहे दादांच्या कामाची पद्धत! येणाऱ्या काळात केरळच्या धर्तीवर लोकसेवा आयोग मजबूत करणे, टप्प्याटप्प्याने सर्व भरती आयोगाच्या अंतर्गत आणने, परीक्षा निश्चित कालावधीत पूर्ण करणे अशा कितीतरी बाबी दादांच्या विचाराधीन आहेत, या सर्व बाबी येणाऱ्या काळात पूर्ण होतील आणि स्पर्धा परीक्षांना एक वेगळी दिशा मिळेल हा विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकार हे जनतेचं सरकार आहे ,या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत आणि आज कोरोनाच्या काळात असंख्य अडचणी असताना सुद्धा सरकार या सर्व अपेक्षांवर खरे उतरत आहे. नुकत्याच आलेल्या पुराने फटका बसलेल्या नागरिकांसाठी सरकारने तब्बल साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज सरकारने जाहीर केले आहे. राज्यासमोर आर्थिक अडचणी असल्या तरी महाराष्ट्र मात्र या महाविकासआघाडी सरकारने थांबू दिलेला नाही, प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राची घौडदौड कायम ठेवली आहे . असे रोहित पवार यांनी म्हंटल.

प्रियांका गांधी वाड्रा होणार उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री ; राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिवांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात आघामी निवडणुकीच्या दृष्टीने घडामोडी घडू लागलेल्या आहेत. अनेक राज्यांच्या राजकीय विश्लेषकांकडून आगामी काळात विरोधी पक्षांनी राज्यात कोणाशी आघाडी करायची? केल्यास कोण मुख्यमंत्री होतील, असे दावे केले जात आहेत. यातच आता उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी वाड्रा या काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असा दावा उत्तर प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

देशातील काही राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाकडून पक्षसंघटना बळकटीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातील एक उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान आज काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात नवा दावा केला आहे.

यावेळी राजेश तिवारी यांनी सांगितले की, पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका प्रियांका यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकाऱ्यांनाही प्रियांकांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

मनपाकडून लॉकडाऊनमध्ये तब्बल एक कोटींची वसुली

Muncipal Corrparation

औरंगाबाद | कोरोना महामारीच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे शासनाकडून संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्याचबरोबर कोरोनाचे संकट कमी होत असताना निर्बंध शिथिल करण्यात आले होते. तथापि महापालिकेच्या मालमत्ता विभागाने लॉकडाऊनमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांची वसुली केली. मालमत्तांचे भाडेकराराची नूतनीकरण, गाळ्यांचा लिलाव, जमीन भाडेपट्टा यातून चार महिन्यात ही वसुली झाली असल्याचे उपआयुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमूळे बाजारपेठेसह दुकाने दोन्ही नाट्यगृहे बंद ठेवण्यात आले होते. तरीही महापालिकेच्या मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांनी व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे, भाड्यांच्या कराराचे नूतनीकरण, गाळ्यांचा लिलाव, आठवडी बाजार, पे अँड पार्किंग, जमीन भाडेपट्टा इत्यादी ठिकाणी वसुली केली. कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यानंतर कोणाचे नियम शिथिल करण्यात आले होते. यावेळी प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी उत्पन्नवाढीसाठी सूचना दिल्या होत्या.

चार महिन्यामध्ये तब्बल 1 कोटी 4 लाख 1873 रुपये वसुली करण्यात आली. व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे 12 लाख 13 हजार 854 रुपये, जाहिरात फलक 38 हजार 477,पे अँड पार्किंग 34 लाख 39 हजार 700, दुकाने 4 लाख 70 हजार आणि आठवडी बाजार 29 हजार 540 रुपये, लिज चे 2 हजार रुपये, जमीन भाडेपट्टी, 27 लाख 26 हजार 981, कॉर्टर्स आणि वॉटर चे 23 लाख 40 हजार रुपये, आणि इतर 1 लाख 40 हजार 482, याप्रमाणे 1 कोटी 4 लाख 1 हजार 873 रुपये वसुल करण्यात आले आहे.

..आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुर्चीवरुन उठून उभे राहून त्यांना हात जोडले; कोण होते ते लोक?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पूरपरिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. यावेळी काही लोक मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन द्यायला आले होते. त्यांना पाहून ठाकरे खुर्चीवरुन उठून उभे राहिले अन् त्यांना विनम्रतेने हात जोडले. मुख्यमंत्र्यांचा तो फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतील ती व्यक्ती कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फोटोतील व्यक्ती ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर आहेत. मिरजकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले असता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे खुर्चीवरून उठून उभे राहिले. त्यांनी विनम्रपणे हात जोडले, नमस्कार केला…… मुख्यमंत्र्यांमधील संवेदनशील आणि विनम्र व्यक्तीचा अनुभव पुन्हा एकदा महाराष्ट्राला आला.

खरं तर विश्वनाथ मिरजकर आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट. श्री. मिरजकर त्यांना निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना मिरजकर हे ज्येष्ठ शिक्षक व शिक्षक चळवळीचे नेते असल्याची ओळख करून दिली. आपल्या समोर एक ज्येष्ठ शिक्षक उभा आहे, हे लक्षात येताच श्री. ठाकरे खुर्चीतून उठले आणि त्यांनी विनम्रपणे हात जोडले. प्रश्न समजून घेतले.

मुख्यमंत्र्यांनी थेट उभं राहून नमस्कार केल्यानंतर विश्‍वनाथ मिरजकर भारावून गेले. आम्ही अनेकदा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली. त्यांनी ती खुर्चीत बसूनच हाती घेतली. आम्ही उभे असायचो, फोटो काढायचो. परवा मात्र धक्का बसला. मुख्यमंत्री उठून उभे राहिले आणि उभे राहून त्यांनी आमचे निवेदन घेतले. गुरुजणांप्रतीची ही विनम्रता मनाला स्पर्श करून गेली. असे त्यांनी म्हंटल.

राजकीय नेत्यांनी सामान्य माणसाला भरभरून पैसे, निधी, मदतच द्यायला हवी, असे प्रत्येकवेळी नसते. थोडाशा सन्मानानेही सामान्य माणूस भारावून जातो. हा सन्मान दीर्घकाळ स्मरणात राहतो. शिक्षकांचे प्रश्‍न कालही होते, आजही आहेत, उद्याही असतील… कुठल्याच घटकाचा प्रश्न कधीच शंभर टक्के संपत नसतो. तो हाताळताना जबाबदार घटक ज्याचा प्रश्‍न आहे, त्याच्याविषयी किती आत्मीयता दाखवतात, हा खरा मुद्दा असतो.

आरक्षण द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा; जबाबदारी झटकू नका; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग ठरवून देण्याचे अधिकार राज्यांना मंजुरी दिल्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे असे म्हंटले होते. यावरून भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “आरक्षण द्यायचे नसेल तर स्पष्टपणे सांगा. मात्र, जबाबदारी झटकू नका,” अशा शब्दात फडणवीसांनी निशाणा साधला.

मुंबईतील नायगाव पोलीस वसाहतीतील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्यानंतर त्यांची आज भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. तसेच त्यांनी यावेळी विविध विषयांवर तेथिल रहिवाशांशी चर्चा केली. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. मात्र, राज्य सरकार जाणीवपूर्वक आपली जबाबदारी झटकत आहे. वास्तविक या सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. तुम्हाला आरक्षण द्यायचे नसेल तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. मात्र, आपली जबाबदारी झटकून टाकू नये, असे फडणवीस म्हणाले.

नायगाव येथील रहिवाशांशी झालेल्या चर्चेदरम्यान फडणवीस म्हणाले की, येथील रहिवाशांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सेतू निर्माण करायचा म्हणून या ठिकाणी आलो आहे. येथील रहिवाशांच्या प्र्श्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी तसेच गृहमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी दिले.

पुण्यतिथी: आजही मर्लिन मुनरोचा मृत्यू एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 50 आणि 60 च्या दशकात जगाच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हॉलीवूडची सुपरस्टार मर्लिन मुनरोचे वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले. तिच्या मृत्यूवर अजूनही कोणाचा विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला – असे कसे होऊ शकते. इतक्या लहान वयात एवढी मोठी सुपरस्टार कशी जाऊन शकेल? तसेच, मर्लिनच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्नही उद्भवले आणि आजही ते उदयास येतात. तिचा मृत्यू तेव्हाही एक गूढ होते आणि आजही ते एका रहस्यापेक्षा कमी नाही जो सोडवता आलेले नाही. ती अशी व्यक्ती होती, जिच्यावर जगातील प्रत्येक भाषेत पुस्तक लिहिले गेले आहे. तिच्यावर कितीतरी चित्रपट आणि डाक्यूमेंट्री बनल्या आहेत.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यासोबतचा तिचा रोमान्स आणि नंतरच्या तिच्या गूढ मृत्यूने या अभिनेत्रीला नेहमीच रहस्यमयतेमध्ये गुंडाळले. काहींनी तिच्या मृत्यूचा संबंध केनेडी बंधूंशी असलेल्या नात्याशी जोडला. तर काहींनी तिच्या रहस्यमय मृत्यूमागे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचा हात असल्याचे सांगितले. यामागील सत्य जाणून घेण्यासाठी, या खटल्याची फाईल तिच्या मृत्यूच्या 10 वर्षांनंतर पुन्हा उघडली गेली परंतु कोणतेही निकाल लागू शकला नाही.

मर्लिनचा जन्म झाला तेव्हा तिची आई खूपच वाईट मनःस्थितीतून जात होती. त्या वेळी ती मेंटल हॉस्पिटलमध्ये होती. आपले वडील कोण होते याची तिला कल्पना देखील नव्हती. लहानपणी ती अनाथाश्रमात आणि आपल्या नातेवाईकांच्या घरीही राहत होती. लहानपणी तिला लोकांच्या घरी मोलकरणीसारखी कामंही करावी लागायची. अशा परिस्थितीत तिचे बालपण आणि आयुष्य कसे गेले असेल, याचा अंदाज बांधता येईल.

ती लहानपणापासूनच सुंदर होती. हा प्रश्न तिच्या मनात फिरत राहिला -” देवा हे माझ्याबरोबरच का आहे – ना वडिलांचा पत्ता आहे ना आईच्या प्रेमाची सावली … आणि हे कठोर जीवन …” असे म्हणता येईल की, मर्लिनचे आयुष्य खडतर होते. तिने प्रत्येक आयुष्याच्या पायरीवर खाचा खाल्ल्या. तिला नेहमी वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले.

दरम्यान, एक तरुण तिच्या सौंदर्यावर भाळला. लग्न झाले. मात्र, या लग्नात फारसा आनंद नव्हता. सासरच्या घरची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे तिने सासू-सासऱ्यांसोबत एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली. त्याचवेळी अचानक तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले.

योगायोगाने एक प्रसिद्ध छायाचित्रकार तिथे पोहोचला. त्याने मर्लिनचे फोटो काढले आणि ते एका मासिकात प्रकाशित केले आणि नंतर तिचे आयुष्य बदलले … ज्यानंतर तिला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर येऊ लागल्या. मर्लिन परिस्थितीशी तडजोड करायची पण महत्वाकांक्षी होती आणि तिची इच्छाशक्ती देखील आश्चर्यकारक होती. लहानपणीच तिला स्वप्न पडायचे कि, एक दिवस ती मोठी नायिका बनेल आणि भरपूर नाव कमवेल. आता हे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली होती.

हॉलिवूड मधील चित्रपटांमध्ये संधी मिळवण्यासाठी तिने एजंटांना पकडले. ते तिला अशा लोकांकडे घेऊन गेले, ज्यांना तिच्या शरीरातच जास्त आणि संधी देण्यास कमी रस होता. पण तिला फारसा फरक पडला नाही, आयुष्याने तिला लहानपणापासूनच धक्के खाण्याची सवय लावली होती. चित्रपट मिळाले आणि तडजोडही करावी लागली. सुरुवातीला तिचा अभिनय उग्र होता. तिने त्यात बदल केले. तिची इच्छाशक्तीच तिला मोठ्या उंचीवर घेऊन गेली.

तिचे सौंदर्य असे होते की, कोणीही तिच्यावर सहज भाळू होऊ शकत होता. अशा परिस्थितीत, तिच्या आयुष्यात अनेक पुरुष आले जे तिच्यावर भाळले तर काहींवर ती भाळली. यात काही प्रसिद्ध लोकं होती, काही भरपूर पैसा असलेले तर काही पॉवरफुल लोकं होती. एक वेळ अशी आली जेव्हा मर्लिन संपूर्ण जगाची स्वप्नसुंदरी बनली. तिचे चित्रपटही सुपरहिट होऊ लागले. पैशांचा ओघ सुरू झाला. आता तिच्याकडे सर्व काही होते, संपत्ती-कीर्ती-बंगला.

या काळात अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनाही ती खूप आवडू लागली. ती सुद्धा त्यांच्या जवळ आली. तिला अनेकदा केनेडीसोबत पाहिले गेले. तिच्या आणि केनेडीच्या रोमान्सच्या चर्चाही पसरू लागल्या. मात्र, जेव्हा केनेडीने नंतर तिला दूर केले तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. मर्लिनच्या आयुष्यात दुःखच दुःख होते. ज्यात तिचे तीन अयशस्वी विवाह आणि आई होऊ न शकल्याची खंत अखेरपर्यंत राहणार होती.

आयुष्यातील जखमांनी तिला आयुष्यभर असुरक्षित ठेवले. तिला झोपही येत नव्हती. यासाठीच्या गोळ्या वाढतच राहिल्या. मात्र एके दिवशी अचानक तिच्या मृत्यूची बातमी आली. वय अवघे 35-36. संपूर्ण जग स्तब्ध झाले. आजही तिचा मृत्यू हे एक प्रकारचे गूढच आहे. CIA नेच तिची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला होता. तपास झाला. काहीही कळले नाही आणि हे रहस्य अजूनही कायम आहे. पण हे मात्र खरे की, मर्लिन अजूनही हॉलीवूडची एक अशी सदाबहार अभिनेत्री आहे, जी तिच्या मृत्यूनंतरही अमर झाली आहे. तिचे चित्रपट सुपरहिट आहेत. ती अजूनही जगातील परफेक्ट ग्लॅमरस गर्ल मानली जाते.

पैठणगेट भागात कपड्याचे दुकान फोडले

paithan gate

औरंगाबाद | कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यानी दुकानातील महागडे रेडिमेड कपडे व इतर साहित्य लंपास केल्याची घटना आज सकाळी पैठणगेट भागात समोर आली आहे. नेमके किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला हे मात्र दुपार पर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.

शेख जावेद अब्दुल राफे वय- 40 वर्षे (रा. औरंगाबाद) यांची पैठणगेट भागात एम.आर. कलेक्शन नावाने रेडिमेड कपड्याची दुकान आहे. नित्य प्रमाणे बुधवारी रात्री त्यांनी कपड्याची दुकान बंद करून घरी गेले होते. आज सकाळी शेजारील दुकानदार जेंव्हा दुकान उघडण्यासाठी आले तेंव्हा शेख यांच्या दुकानाचा शटर उचकटलेले दिसले. शेजाऱ्यांनी माहिती देताच शेख यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील महागड्या जीन्स पॅन्ट आणि शर्ट व इतर साहित्य चोरीला गेले असल्याचे समोर आले.

घटनेची माहिती प्राप्त होताच क्रांतिचौक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासला मात्र त्यामध्ये चार तासापूर्वी पेक्षा अधिकचा फुटेज दिसत नसल्याने मेमरी कार्ड काढून ते फुटेज संगणकावर तपासण्यात येत आहे. दुकानदारांची फिर्याद प्राप्त न झाल्याने नेमके किती रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. ते दुपार पर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते.

प्लॉट खरेदी करण्यासाठी चक्क मृत व्यक्तीला दाखवले जिवंत

City chouk police station

औरंगाबाद | पैशांसाठी आजकाल कोण कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही. याचे अजुन एक उदाहरण आता औरंगाबादेत समोर आले आहे. सन 1998 साली मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावावरील प्लॉट ती व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून सन 2010 मध्ये खरेदी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात जीपीए अधिकार घेतलेल्या व्यक्तीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, निळकंठ बाके (रा. जोहरीवाडा, औरंगाबाद) यांनी 1973 साली भावसिंगपुरा येथील 3 हजार 76 फुटांचा प्लॉट पेठे यांच्याकडून खरेदी केला होता. ज्याची सरकारी किंमत 7 लाख 50 हजार रुपये आहे. बाके हे नोकरीच्या निमित्ताने नागपुरला स्थलांतरित झाले होते. त्यानंतर तेथेच त्यांचा 14 ऑक्टोबर 1998 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या नावावरील प्लॉट त्यांच्या वारसा हक्काने त्यांची तिन मुले एक मुलगी यांच्या नावे करण्यासाठी त्यांनी त्यासंदर्भात कागदपत्रे तक्रारदार सुधीर नाईक यांच्याकडे दिले.

त्या कागदपत्रांच्या आधारे नवीन सातबारा काढण्यासाठी नाईक जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता, मृत निळकंठ बाकी यांच्या नावे खोटे खरेदीखत 2010 साली झाल्याचे समोर आले. या खरेदीखताच्या आधारे गुप्ता नावाच्या व्यक्तीला 2017 मध्ये हा प्लॉट विकून टाकल्याने ही दिसून आले. नाईक यांनी अधिक माहिती घेतली असता, गणेश नालेगावकर यांनी हे खरेदीखत केले असून, साक्षीदार म्हणून प्रीतम हरिभाऊ पाटील व दुर्गादास धुमाळ यांनी सह्या केलेल्या आहेत.

भाजपच्या उपसभापतीला मारहाण प्रकरणी शिवसेना-काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक

city chouk police station

औरंगाबाद | स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हटविल्याचा आरोप करीत काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे नवनियुक्त उप सभापती अर्जुन शेळके यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिटीचौक पोलीसांनि या सहा पदाधिकाऱ्यांना आज सकाळी अटक करण्यात आली. पंचायत समिती गट नेता अनुराग आप्पासाहेब शिंदे, पं.स.सदस्य विजय शेषराव जाधव, शिवसेना विभाग प्रमुख मंगेश काशीनाथ जाधव, गौतम कांतीलाल उबाळे,उल्हास दिनकर देशमुख, जाफर बहाद्दूर खान पठाण अशी अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

2 ऑगस्ट रोजी पंचायत समितीचे नवनियुक्त उप सभापती अर्जुन शेळके यांनी त्यांच्या दालनात असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हटविल्याचा आरोप करीत सात ते आठ कार्यकर्त्यांनी शेळके यांना खुर्च्या, हाता चापटाने मारहाण केली होती. या मारहाणीत शेळके जखमी झाले होते.

या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिटीचौक पोलिसांनी घटनेची हकीकत जाणून घेण्यासाठी पंचायत समिती मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. त्या आधारे तपास करून आज पोलिसांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहा पदाधिकारी यांना अटक केली आहे. दुपार पर्यंत अटकेची प्रक्रिया सुरू होती. अटकेतील सहाही पदाधिकाऱ्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.