पाहताच क्षणी धडकी भरवणार्‍या शिखरावर चढाई करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना; पहा व्हिडिओ

पुणे | सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा तैल-बैला (फ्रंट वॉल) टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करीत तिरंगा फडकावित केलेली ही साहसी मोहीम भारतीय नौदलास समर्पित केली.

या मोहीमेची सुरवात तैल-बैला गाव, ता. मुळशी, जि.पुणे येथून झाली. अवघ्या पाऊण तासांची पायपीट तैल-बैला च्या पायथ्याला घेऊन जाते. आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते.

पहिला १०० फुटी टप्पा पार केल्यावर एक छोटा ट्रॅवर्स मारल्यावर २० फुट आरोहण केल्यावर दुसरा टप्पा येतो. या नंतर अंगावर येणारा पुढील १०० फुटी टप्पा चिकाटीने पार करताना कस लागतो. शेवटचा ३० फुटी टप्पा पार केल्यावर शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील ३०० फुटी सरळसोट कठीण चढाई, २०० फुटी रॅपलिंगचा थरार, पाहताक्षणीच मनात धडकी भरावी असे तैल-बैलाचे रांगडे रूप, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या चेतन शिंदे, जॅकी साळुंखे, ज्ञानो ठाकरे, मंदार आव्हाड, रोहित पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारचे गिर्यारोहक रोहित जाधव, ज्योती राक्षे-आवरी, माधुरी पवार, प्रदीप बारी, अथर्व शेटे, आरोही सचिन लोखंडे (वय ६ वर्षे) ज्ञानदा सचिन कदम(वय ६ वर्षे), शिवाजी जाधव, डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

You might also like